खासदार राखोहुल शेवाळे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळातदेखील दिसून आले. गेले दोन दिवस या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचे बघायला मिळालं. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली नव्हती, असेही ते म्हणाले. दरम्यान, फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिली असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासाचा अहवाल आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही सोमवारी फडणवीसांवर हक्कभंग आणणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “टॅक्सी समोर आणि मागे लाल दिव्याची गाडी…”, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितला ‘तो’ किस्सा

काय म्हणाले नाना पटोले?

“काल विधानसभेत नागपूर NIT च्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आला आहे. याबाबतची याचिका फडणवीस यांनीच दाखल केली होती. मात्र, राज्यात सत्ताबदल होताच त्यांनी ही याचिका मागे घेतली. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी हा घोटाळा केला, हे सिद्ध होतं आहे. तसेच रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी सुद्धा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर गुन्हा रद्द करण्याचा प्रयत्न झाला आणि क्लोजर रिपोर्ट न्यायालयात पाठवण्यात आला. त्यावर न्यायालयाने काल ताशेरे ओढले. हा मुद्दाही मी विधानसभेत उपस्थित केला होता. हे दोन्ही मुद्दे बघितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध होते आहे. त्यामुळे दिशा सालियांच्या मृत्यूचा मुद्दा काढण्यात आला”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“फडणवीसांवर हक्कभंग आणणार”

“सीबीआयने दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास केला होता. याबाबतची तक्रार नारायण राणे यांनी केली होती. या तपासाचा अहवाल आमच्याकडे आहे. मात्र, फडणवीस म्हणतात की दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने केला नाही. सभागृहाला खोटी माहिती देणं, हा सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे आम्ही सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणार”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा – राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली? मनसे आमदार राजू पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“केंद्राच्याइशाऱ्यावर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न”

दरम्यावेळी बोलताना सीमावादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले. “मी सुरुवातीपासून सांगतो आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. मात्र, महाराष्ट्राचे सरकार या संदर्भात गप्प बसले आहे. त्यामुळे अमित शहांबरोबर झालेली बैठक महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nana patole will bring privilege motion against devendra fadnavis on disha saliyan death issue spb
Show comments