काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला धक्का बसला होता. काँग्रेस पक्षाने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिला नसल्यामुळे नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच समाजाची भावना लक्षात घेऊन आपण काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सष्ट केले होते. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी नसीम खान यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अखेर नसीम खान यांनी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नसीम खान हे नाराज झाल्याची चर्चा होती. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसने अल्पसंख्याकांना एकही उमेदवारी का दिली नाही? असा सवाल त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना केला होता. यानंतर आता त्यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा : संजय राऊत यांचा दावा, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता, म्हणूनच..”
नसीम खान काय म्हणाले?
“पक्षाच्या वरिष्ठांबरोबर सविस्तर चर्चा झाली. मी (नसीम खान) पदासाठी काम करत नाही तर काँग्रेस पक्षाच्या विचारधारेसाठी काम करत आहे. तसेच गांधी कुटुंबाच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. अशीच भूमिका माझी कायम राहिलेली आहे. मी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेत असून सर्व राज्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनाही माझे आवाहन आहे की, त्यांनी आपले राजीनामे मागे घ्यावेत. पक्षातील वरिष्ठांनी आपल्या भावना समजावून घेतल्या आहेत”, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.
“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पक्षाच्या कामाला लागणार आहोत. हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी मिळून घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराच्या कामाला आम्ही लागणार आहोत. संविधान बदलण्याचा भाजपाचा जो कट आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी इंडियाचा पंतप्रधान झाला पाहिजे”, असे नसीम खान माध्यमांशी बोलताना म्हणाले.