लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपा आणि काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात मात्र, अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. असे असतानाच मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काँग्रेसला धक्यावर धक्के बसत आहेत. काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी (१२ मार्च ) महाराष्ट्रात दाखल झाली. मात्र, एकीकडे भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली आणि दुसरीकडे नंदुरबारमध्येच काँग्रेसला मोठा धक्का बसला.
नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून पद्माकर वळवी हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. तसेच ते भाजपाच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात होते. अखेर त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची भाजपाकडून राज्यसभेवर वर्णी लागली. तसेच मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर धाराशिवमधील काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. या नेत्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला.
पद्माकर वळवी कोण आहेत?
पद्माकर वळवी हे नंदुरबारचे माजी पालकमंत्री आहेत. पद्माकर वळवी यांनी शहादा मतदारसंघातून २००९ साली निवडणूक लढवली होती. सध्या ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते मोठे नेते समजले जातात. त्यांनी विविध मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आज पद्माकर वळवी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
हेही वाचा : नाशिकच्या जागेवरून महायुतीत बेबनाव? श्रीकांत शिंदेंची घोषणा स्थानिक भाजपाला अमान्य; हेमंत गोडसेंना विरोध!
भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल
काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ते या यात्रेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सभा, मेळावे घेत आहेत. राहुल गांधी यांच्या या यात्रेमुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले असून १७ मार्चला राहुल गांधी यांची मुंबईत मोठी सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत.