सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत काँग्रेस सोडू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांचेही नाव चर्चेत येते. परंतु त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला असून आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जातात. हा भाजपच्या मनाचा खेळ आहे, अशा स्पष्ट शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मुख्यमंत्री अशोच चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपच्या दिशेने वाटचाल करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात दुपारी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यातील ताज्या घडामोडींवर भाष्य केले. अलिकडे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांच्यासारख्या बड्या भारदस्त नेत्यानेही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. भाजपचे हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वारंवार केवळ विरोधी नेत्यांवर दबाव आणला जातो. त्यांचा हेतूपूर्वत मानसिक त्रास दिला जातो. एका प्रकारे ब्लॕकमेल करण्यात येतो. त्यातूनविरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावून स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. म्हणूनच अशोक चव्हाण यांनी केवळ त्रास वाचविण्यासाठी हतबल होऊन काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : शिंदे-फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यातील सौहार्द उघड!

विरोधी पक्ष संपविण्याचा आणि देशात स्वतःचा एकच पक्ष राखण्याचा घृणास्पद प्रयत्न भाजपकडून होत असून इतक्या खालच्या पातळीपर्यंतचे राजकारण होत आहे. आपल्यासह इतर काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा सोडल्या जातात. हे काही नवीन नाही. परंतु आपण काँग्रेस सोडून भाजप किंवा अन्य कोणत्याही सोयीच्या पक्षात जाण्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवू शकत नाही. आपल्यावर ईडी वा अन्य यंत्रणांचा दबाव येऊ शकत नाही. कारण आपण वा आपले कुटुंबीय कोणत्याही संस्थांशी वा आर्थिक व्यवहाराशी संबंधित नाहीत. आपले राजकारण ज्या मूलभूत मूल्यांवर आधारले आहे, ती मूलभूत तत्त्वे केवळ काँग्रेस पक्षाची आहेत. ती भाजपकडे अजिबात नाही. आपण काँग्रेसी जन्मले, काँग्रेसी म्हणून घडले आणि काँग्रेसी म्हणून मरेन, अशा निष्ठांचा त्यांनी पुनरूच्चार केला. काँग्रेसमधून कितीही नेत्यांना फोडले तरीही काँग्रेस विचार कोणीही संपवू शकत नाही. सामान्य जनता, मध्यमवर्गीय भाजपच्या या घाणेरड्या राजकारणाला वैतागले असून राज्यात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीच्या बाजूने कल वाढत असल्याचा दावाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader praniti shinde on ashok chavan s resignation blames ed investigation css
Show comments