महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आज होणार असून सायंकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय देणार आहेत. तत्पूर्वी अनेक राजकीय पक्षांचे नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना जर निलंबित केले, तर हा उच्च पातळीवरचा राजकीय निर्णय असेल. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येईल. तसेच विधानसभा अध्यक्ष एका राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे रामशास्त्री प्रभुणे यांच्याप्रमाणे ते निर्णय देतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरू शकते, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांना माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, राज्यातील सर्व पक्षांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. या निर्णयाचे घटनात्मक आणि राजकीय असे दोन पैलू आहेत. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ साली हा कायदा अस्तित्त्वात आला होता. २००३ साली वाजपेयी सरकारमध्ये अरुण जेटली यांनी त्यात आमूलाग्र बदल केले. त्यानंतरही या कायद्याचे उद्दिष्ट सफल झालेले नाही. त्यामुळे पक्षांतर राजरोसपणे चालू आहे. या कायद्यात बदल केले पाहीजेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांचे सदस्यत्व निलंबित करून त्यांचे मंत्रिपद काढून घेतले पाहीजे. ते पुन्हा आमदार होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावर राहता येणार नाही. ही कायदेशीर बाब झाली.
अध्यक्ष रामशास्त्री प्रभुणे नाहीत
पण या प्रकरणातील एक अडचणही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली. ते म्हणाले, “या सर्व प्रकरणाची सुनावणी घेऊन निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. अध्यक्ष एका पक्षाचे नेते असल्यामुळे स्वपक्षाचे विचार लक्षात न घेता रामशास्त्री प्रभुणे यांच्याप्रमाणे निर्णय घेतील, अशी आशा आजच्या युगात ठेवणे चुकीचे आहे.”
हे ही वाचा >> Disqualification Verdict : निकालापूर्वी राहुल नार्वेकर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “निकालातून सर्वांना न्याय…”
“शिवसेनेच्या नोंदणीकृत पक्षाने आमदारांना तिकीट दिले होते. त्या तिकीटाच्या आधारावर ते आमदार निवडून आले. त्यानंतर नेतृत्वाबाबत पक्षात वाद झाले वैगरे हे सर्व ठिक आहे. पण जर पक्षांतर झाले असेल तर सदस्यत्व निलंबित व्हायला हवे. इथे पक्षांतर झाले, हे गृहित धरायला हवे होते. त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होता. पण निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारकीची कवच कुंडले वापरून पक्षांतर होत असेल, तर अत्यंत चुकीचे आहे”, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ
हे सर्व ठरविल्याप्रमाणे होत आहे का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता पृथ्वीराज चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळली. हे सर्व ठरवून केलेले असते तर निकाल एका महिन्यातही लागला असता. हे प्रकरण घटनात्मक पेचप्रसंगाचे आहे. त्यामुळे पक्षांतरी बंदी कायद्यात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. यानंतरही जर आज निकाल वेगळा आला तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहेच.
भाजपाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर नेतृत्वात बदल करायचा असेल तर आज एक संधी आहे, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. एकाबाजूला कायद्याचा आधार घेऊन हा बदल झाला, असेही सांगता येईल. पण ते आजच होईल का? याबाबत मी आज काही बोलू शकत नाही. पण ही भाजपासाठी संधी आहे, एवढे निश्चित.