कराड : भाजप नेत्यांशी अजित पवारांच्या गुप्त बैठका सुरू होत्या. त्याबाबत मी यापूर्वी बोललो होतो. अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे, पण त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या वरिष्ठांचा विरोध आहे. तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला गेला आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला.
चव्हाण म्हणाले की, सध्या अजित पवारांकडे दोन तृतीयांश म्हणजेच ३६ किंवा त्याहून अधिक आमदार नसावेत. त्यांच्या बंडामागे शरद पवारांची खेळी असेल असे मला वाटत नाही. भाजप राज्यातील महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहे. त्यानुसार काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आमचे दोन तृतीयांश म्हणजे ३० आमदार फुटतील असे आपल्याला वाटत नाही, असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके संख्याबळ स्पष्ट झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे हा विषय मार्गी लागेल आणि महाराष्ट्रात भाजप पाच वर्षे सत्तेत राहणे हा सर्वात मोठा धोका होता, म्हणून आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय १० ऑगस्टपूर्वी अपेक्षित आहे. त्यामुळे भविष्यातील तरतुदीसाठी राष्ट्रवादीत फूट पाडण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन शिंदेंना शांत केले जाईल. – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री