Prithviraj Chavan On Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रासांठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी मोठा दिलासा देण्यता आला आहे. त्याबरोबर शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह विविध क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जरोदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अर्थसंकल्पाबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच या अर्थसंकल्पामुळे आमची घोर निराशा झाली, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
“लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. यामध्ये केंद्र सरकारने एक गोष्ट मान्य केली आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा मंदावत आहे. विकासदर मंदावत असल्यामुळे त्याचे अनेक परिणाम होत आहेत. रोजगार निर्माण होत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. कृषी अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. या अर्थसंकल्पात महागाईवर काहीही उपाययोजना केलेली नाही. आम्हाला अपेक्षा होती की अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचं काम हे सरकार करेल. मात्र, असं काहीही झालं नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पामुळे आमची घोर निराशा झालेली आहे”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
“भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदराबाबत अनेक तज्ञांनी शंका व्यक्त केली आहे की आपण ६ टक्केही विकास दर गाठू की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे मोदी सरकारला माझा प्रश्न आहे की २०४७ मध्ये भारत विकसित राष्ट होणार हे जे स्वप्न तुम्ही दाखवत आहात. भारत विकसित राष्ट्र झालं तर आम्हाला आनंदच वाटेल. मात्र, विकसित भारताची व्याख्या काय? यावर केंद्र सरकार काहीही बोलत नाही. एका बाजूला देश श्रीमंत आहेत, पण लोक गरिब आहेत”, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली. दरम्यान, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
“बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर ही मलमपट्टी करण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल करणं आवश्यक होतं. पण हे सरकार विचारांनी दिवाळखोर आहे”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर बोलताना केला. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
केसी वेणुगोपाल काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनीही अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका केली. केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं की, “भारताची ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हा अर्थसंकल्प काहीही करणार नाही. सरकारने समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांसाठी कोणताही दिलासा दिलेला नाही. फक्त पोकळ घोषणा केल्या आहेत. तसेच फक्त पोकळ घोषणा देऊन जनतेची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न केला आहे”, असं केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.