कराड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत संभाजी भिडेंवर अटक करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण यांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> Video : “देशाचा जीडीपी जैन समाजाजवळ, त्यांच्या श्रमातून…”, देवेंद्र फडणवीस यांचं विधान
पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून ई-मेलद्वारे धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. पोलिसांकडून या ई-मेलद्वारे धमकी प्रकरणी सायंकाळपर्यंत कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही धमकी देणारी व्यक्ती नांदेडची असून, तो पकडला गेला आहे. त्यास ताब्यात घेण्यासाठी कराड शहर पोलिसांचे पथक नांदेडकडे रवाना झाल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले आहे.
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्याबद्दल तत्काळ अटक करावी अशी मागणी सभागृहात केली होती. यावर विधानसभेत एकच गोंधळ उडाला होता. तर, दुसरीकडे महाराष्ट्रभर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर काल शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेलवरून ‘गुरुजींना अटक करा म्हणून बोलतो काय जिवंत राहायचे आहे का?’ अशी धमकी देण्यात आली.
हेही वाचा >>> “महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या रक्तात शिवप्रेम भिनलेलं असतं”, उद्धव ठाकरे यांचं विधान
आज रविवारी सकाळी पृथ्वीराज चव्हाणांचे कार्यालय सुरू झाल्यानंतर त्यांचे सहाय्यक ई-मेल तपासत असताना हा धमकीचा ई-मेल निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. त्याअनुषंगाने पोलीस एकंदर प्रकाराची माहिती घेत आहेत. हा ई-मेल कोणाच्या मेलवरून आला? तो कुठून पाठवला? ई-मेल करणारी व्यक्ती कोण? ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बोगस ई-मेल अकाउंटचा वापर केला आहे किंवा काय? याबाबतची नेमकेपणाने माहिती घेतली जात आहे. दरम्यान, हे गैरकृत्य करणाऱ्याला नांदेंड येथे पोलिसांनी पकडले असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी कराड पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितल्याने ही धमकी देणारी व्यक्ती आणि त्यामागे कोण? याची आता उत्स्कुता राहणार आहे.