Priyanka Gandhi : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर करत रत्नागिरीमधील रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटनाआधीच कोसळल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत महायुतीच्या सरकारवर त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच राज्यातील मुंबई-नाशिक महामार्ग, सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला, अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले, अशा काही कामांचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकार असून येथील जनता लवकरच हिशेब करेन, असा हल्लाबोल प्रियांका गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा : “भाजपाप्रणित तिघाडी सरकारने ४० हजार कोटींची देणी ठेवली, दुसरीकडे ९६ हजार कोटींची…”; सुप्रिया सुळेंची पोस्ट

प्रियांका गांधींनी काय म्हटलं?

“महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले आहे. दुसरीकडे मुंबई-नाशिक महामार्ग जो अद्याप पूर्णत: तयारही झाला नव्हता. त्यात ५०० हून अधिक खड्डे पडले आहेत. यापूर्वी सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला. मुंबईत १८ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. महाराष्ट्रातील खोके आणि धोके सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून अगणित भ्रष्टाचार केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता याचा लवकरच हिशेब करणार आहे”, असा इशारा प्रियांका गांधी यांनी महायुतीला दिला आहे.

उद्घाटनाआधीच रेल्वे स्थानकाचे छत कोसळले?

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रत्नागिरीमधील रेल्वे स्थानकाचे छत उद्घाटनाआधीच कोसळल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरूनच प्रियांका गांधी यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल करत विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून अगणित भ्रष्टाचार महायुतीच्या सरकारने केला असल्याचा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader priyanka gandhi on maharashtra politics mahayuti govt politics and ratnagiri railway station video gkt