Rahul Gandhi Shivaji Maharaj Tweet: संपूर्ण जगभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन लोक महाराजांना अभिवादन करत आहेत. तर सेलिब्रिटी आणि राजकारणी सोशल मीडियावरून जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देत आहेत. मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयंतीनिमित्त केलेली पोस्ट वादात अडकली आहे. राहुल गांधी यांच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला गेला. ज्यावर आता भाजपासह अनेकांनी आक्षेप घेत टीका केली आहे.

भाजपाचे नेते, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर यांनी या पोस्टवर टीका करत कायदेशीर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे. आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामुळे समस्त महाराष्ट्र आणि देशवासियांचा त्यांनी एका अर्थी अपमानच केला आहे. जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात. राहुल गांधी हे महाराष्ट्र आणि देशातील महापुरुषांचा कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. यातलाच हा प्रकार आहे. त्यांनी ही पोस्ट मागे घ्यावी. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

वचिंत बहुजन आघाडीनेही राहुल गांधी यांना एक्स पोस्टद्वारे टोला लगावला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, राहुल गांधीजी जयंतीनिमित्त श्रद्धांजली नाही तर अभिवादन करतात. तुम्ही लिहिलेल्या शब्दातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. माफी मागा आणि अभिवादन व श्रद्धांजली याच्यातील फरक शिकून घ्या.

माजी खासदार संभाजी छत्रपती भोसले यांनीही राहुल गांधींच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. “राहुल गांधींजी जंयतीनिमित्त कुणी श्रद्धांजली व्यक्त करते का?”, असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.

rahul gandhi tweet on shivaji maharaj
राहुल गांधी यांची एक्सवरील पोस्ट

काँग्रेसने काय म्हटले?

राहुल गांधींच्या पोस्टवरून वाद उद्भवल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “राहुल गांधींनी इंग्रजीमधील हम्बल ट्रिब्युट म्हणायचे होते. त्याचाही अर्थ श्रद्धांजली होतो. पण भाजपाने ‘ध’ चा ‘मा’ करत विनाकारण वाद उपस्थित करू नये.” काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, राहुल गांधी यांनी वापरलेल्या शब्दाचा भाजपाकडून बाऊ केला जात आहे. खऱ्या मुद्द्यांवर भाजपाला बोलायचे नाही. महिलांवर रोज अत्याचार होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, यावर भाजपाला उत्तर द्यायचे नाही. त्यावर ते बोलत नाहीत. मात्र व्याकरणातील एक चूक काढून ते त्याचा बाऊ करत आहेत.

Story img Loader