सध्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सामाजिक तसेच राजकीय पातळीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत भाजपावर गंभीर आरोप केले असून कश्मिरी पंडितांबाबतचे सत्य कोणी लपवले असा सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन सावंत यांच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या ट्विटच्या सुरुवातीला ” सत्य कोणी दाबले ? ६ वर्षे सत्तेत असलेल्या वाजपेयींनी ? की ८ वर्षे सत्तेत असलेल्या मोदींनी ? काय आहे सत्य?” असा सवाल केलाय. तसेच पुढे त्यांनी “कश्मिरी पंडित विस्थापित होताना केंद्रात भाजपा समर्थित व्ही. पी. सिंग सरकार होते. भाजपा नियुक्त राज्यपाल जगमोहन यांनी पंडितांना संरक्षण देण्याऐवजी पळण्यास सांगितले. लगेच भाजपाला धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा दिल्याबद्दल जगमोहन यांना भाजपाने चार वेळा खासदार केले व वाजपेयी सरकारमध्ये मंत्री केले,” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

तसेच पुढे त्यांनी कश्मिरी पंडितांचे खरे प्रश्न काय आहेत हेदेखील आपल्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे. “जगमोहनांवर कारवाई करण्या ऐवजी बक्षीसी का? व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा का काढला नाही? कश्मीर पंडितांना कश्मीरमध्ये कधी परत पाठवणार?” असा सवाल सावंत यांनी केलाय.

तसेच सचिन सावंत यांनी भाजपाला कश्मिरी पंडितांबद्दल प्रेम नसून हा चित्रपट समाजात दुही निर्माण करण्यासाठी बनवण्यात आल्याची टीका सावंत यांनी केली. “खरं सत्य काय आहे तर, भाजपाला कश्मीर पंडितांबद्दल प्रेम नाही. द कश्मीर फाइल्स हा चित्रपट समाजात दुही निर्माण करण्यासाठी बनवला आहे. यामागे भाजपाची मंडळी व राजकीय डाव आहे. म्हणूनच पंतप्रधानांसहित सगळे नेते या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत. सत्य समोर आणण्यासाठी चित्रपट बनवावा लागतो का?” असा घणाघात सचिन सावंत यांनी केलाय.

सावंत यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता कश्मीर पंडितांच्या मुद्द्यावरुन वेगळा वाद रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, कश्मीर फाइल्स या चित्रपटात कश्मिरी पंडितांच्या स्थलांतराविषयी भाष्य करण्यात आले आहे. एकीकडे या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट गुजरात, हरियाणा या राज्यांत करमुक्त करण्यात आलाय. भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी केली आहे.