पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक झाल्याचं समोर आलं होतं. मात्र ट्विटर अकाऊंट काही वेळात पुन्हा सुरळीत करण्यात आलं. दरम्यान अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“चौकीदार अपना ट्विटर अकाउंट नहीं बचा सकता वह देश की सीमा कैसे बचा सकता हैं? और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है।” असं काँग्रेस नेते सचिन सावंत ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली होती. “‘पंतप्रधानांचं ट्विटर हँडल @narendramodi सोबत छे़डछाड करण्यात आली होती. ट्विटरला याची माहिती देण्यात आली असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आलं आहे. छेडछाड करण्यात आलेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा,” असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं होतं.

अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्याआधी पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये बिटकॉईनला मान्यता देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. “भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. भारताने ५०० बिटकॉईन खरेदी केली असून देशातील लोकांना वाटत आहे,” असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं होतं.

Story img Loader