रेल्वे इंजिन हे राज ठाकरेंच्या मनसेचं पक्ष चिन्ह आहे. या पक्ष चिन्हाचा फोटो ट्वीट करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज ठाकरेंवर आणि मनसेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर आता सचिन सावंत यांनी ट्वीट करुन राज ठाकरेंना डिवचलं आहे. रेल्वे इंजिन हे चिन्ह पोस्ट करत त्यांनी टीका केली आहे
काय म्हटलं आहे सचिन सावंत यांनी?
विश्वातले एकमेव भरकटलेले इंजिन असं म्हणत सचिन सावंत यांनी मनसेवर टीका केली आहे. काँग्रेससह प्रमुख पक्षांची इंडिया आघाडी तयार झाली आहे. अशात मनसे हा पक्ष कुठेही नाही. त्यांनी भाजपाची साथही दिलेली नाही. तर त्यांनी इंडिया आघाडीतही सहभाग घेतलेला नाही. मनसेने तटस्थ राहणं पसंत केलं आहे. अशात आता सचिन सावंत विश्वातले एकमेव भरकटलेले इंजिन अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. या टीकेला आता मनसेकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राज ठाकरेंनी जुलै महिन्यात काय म्हटलं होतं?
जे काही राजकारण सध्या राज्यात सुरु आहे ते भयंकर आहे. पुढे बघा आणखी किती ते गलिच्छ होतं. हम करे सो कायदा अशी स्थिती आहे. अजूनही निवडणुका लागत नाही. कुणीही काही बोलत नाही, काहीही करत नाही. मोबाइल फोन नावाचं जे माध्यम आलं आहे ना त्यावर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचे. आत्ता तसं घडत नाही. मोबाईलवर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. हे मोबाईलवरचे मेसेज राजकारणी बघत नाहीत. सरकार बघतं तेव्हा लोक शांत असतात कारण त्यांचा राग व्यक्त करुन झालेला असतो. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत हे वठणीवर येणार नाहीत असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
निवडणुकीच्या आधी कोणाबरोबर युती करतात, मग निकाल लागल्यानंतर कोणाबरोबर जाता? मतदारांची अशी प्रतारणा माझ्याकडून होणार नाही. सगळे असंच करायला लागले तर महाराष्ट्राला भवितव्यच उरणार नाही. असं व्यभिचारी राजकारण मी करणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले होते. आता सचिन सावंत यांनी विश्वातलं एकमेव भरकटलेलं इंजिन म्हणत राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे या टीकेला काय उत्तर देणार? हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.