महाराष्ट्रात आत्ताचं जे सरकार आहे त्याला महायुतीचं सरकार असंच म्हटलं जातं आहे. कारण अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसंच त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्याआधी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतले ४० आमदार पक्षातून बंड करुन बाहेर पडले. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्ता सध्या आहे. याच महायुतीच्या सरकारची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे.
काय आहे सचिन सावंत यांचं ट्वीट?
सचिन सावंत यांनी जे ट्वीट केलंय त्यात अंदाज अपना अपना या सिनेमातला एक प्रसंग ट्वीट करण्यात आला आहे. यात आमिर खान, सलमान खान आणि परेश रावल हे एकाच लुनावरुन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान आणि सलमान खान म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट असं दाखवण्यात आलं आहे. तर परेश रावल म्हणजे भाजपा असं दाखवलं गेलं आहे. आमिर खान आणि सलमान खान लुनावर बसलेले असतात पण परेश रावलला जागाच नसते. मागे बसा, पुढे बसा असं दोघे सांगतात. शेवटी परेश रावल चिडतो आणि दोघांना खाली उतरवतो. मग स्वतः लुनावर बसतो आणि लुना सुरु करतो. त्यावेळी सलमान आणि आमिर हे मागच्या सीटवर कसेबसे बसतात. मात्र परेश रावल लुना घेऊन निघून जातो आणि हे दोघे मागेच राहतात. आत्ताच्या भाजपा-शिंदे गट आणि अजित पवार गट या सरकारची अवस्था अशीच आहे असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
शिंदे फडणवीस सरकार राज्यात आलं ते गेल्यावर्षी ३० जून २०२२ ला. या सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच २ जुलै २०२३ ला अजित पवार सत्तेत सहभागी झाले. मात्र तेव्हापासून सातत्याने या सरकारची खिल्ली उडवली जाते आहे किंवा टीका केली जाते आहे. आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेलं हे ट्वीटही चांगलंच चर्चेत आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.