महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी सकाळपासूनच एका जाहिरातीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. शिंदे गटाकडू ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमधील दाव्यांमुळे महाराष्ट्रा एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्यात विसंवाद असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या जाहिरातीतून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी खोचक ट्वीट करून सत्ताधारी भजपा आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.
नेमकं काय आहे या जाहिरातीमध्ये?
मंगळवारी १३ जून रोजी सर्व वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर त्याव चर्चा सुरू झाली. यामध्ये ‘भाजपाला ३०.२ टक्के तर शिवसेनेला १६.२ टक्के जनतेनं कौल दिला’ असा दावा करण्यात आला आहे. तसेच, ‘एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के जनतेनं तर देवेंद्र फडणवीसांना २३.२ टक्के जनतेनं मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली’ असा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. त्याखाली फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच फोटो असून देवेंद्र फडणवीसांच्या फोटोचा यात समावेश करण्यात आलेला नाही.
ही जाहिरात, यातील दावे आणि त्याखालचे फोटो यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “या राज्यातल्या जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगलं काम केलं होतं. मुळात कोण मोठं, कोण लहान हे शिवसेना भाजपात महत्त्वाचं नाही”, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
सचिन सावंतांचं खोचक ट्वीट!
एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जाहिरातीवरून कलगीतुरा रंगलेला असताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी खोचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जाहिरातीच्या बॅनरवर थेट सीआयडीचं एक मीम लावलं आहे. यात सीआयडी मालिकेतील कलाकार शिवाजी साटम यांचा त्यांच्या सहकलाकारांसमवेत फोटो आहे. त्यावर ‘दया कुछ तो गडबड है’ हा प्रसिद्ध डायलॉगदेखील आहे.
या मीमसह सचिन सावंत यांनी ‘दया (सॉरी देवा), कुछ तो गडबड है’ असं ट्वीट केलं आहे. जाहिरातीत एकनाथ शिंदेंची लोकप्रियता फडणवीसांपेक्षा जास्त असल्याचा दावा आणि फक्त नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदे यांचेच फोटो असण्यावरून आता तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.