पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज ते मुंबईतील राजभवन परिसरात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दालनाचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन समारंभाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या संग्रहालयाच्या निर्मित प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी हे संग्रहालय तयार करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भिंगाचा वापर केला गेला असण्याची दाट शक्यता आहे, असे वक्तव्य ट्विटद्वारे केले आहे. तसेच राजकीय अजेंड्यावर कोणालाही वगळले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा >> नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : राहुल गांधी यांची आज ईडीकडून पुन्हा चौकशी
“संघ अनेक वर्षांपासून गांधीजींच्या नेतृत्वातील अहिंसक लढ्याचे महत्त्व कमी करण्याचा व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (संघाचा सहभाग नसल्यामुळे) उजव्या विचारसरणीच्या भिंगातून दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे. आज पंतप्रधान राजभवन येथे ‘गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीज’ या संग्रहालयाचे उद्घाटन करतील. मुख्य प्रवाहातील स्वातंत्र्यलढ्याला या संग्रहालयात स्थान दिलेले दिसत नाही. या लढ्यातही 1942 च्या चलेजाव चळवळीप्रमाणे अनेक हुतात्मा झाले आहेत. दुर्दैवाने बाबू गेनूंचे नावही राजभवनच्या प्रेसनोटमध्ये नाही. श्रीपाद डांगे व इतर कम्युनिस्ट स्वातंत्र्यसैनिकही तुरुंगात गेले होते,” असे सचिन सावंत म्हणाले आहेत.
हेही वाचा >> पोलिसांकडून पी चिदंबरम यांना धक्काबुक्की, हाड मोडलं; म्हणाले “जेव्हा तीन पोलीस कर्मचारी तुमच्या…”
तसेच या संग्रहालयाच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले आहे. “डॉ. विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय तयार करण्यात आले असल्याने संघाच्या भिंगाचा वापर केला गेला असण्याची दाट शक्यता आहे. राजभवनाच्या प्रेसनोटमध्ये नमूद केलेल्या क्रांतिकारकांसह इतर सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानाला स्थान मिळावे अशी मनापासून अपेक्षा आहे. राजकीय अजेंड्यावर कोणालाही वगळले जाऊ नये. आशा आहे की ज्यांना अंदमानच्या कारागृहात शिक्षा झाली व ज्यांनी माफीनामे लिहिले नाहीत त्यांची नावेदेखील असतील. महाराष्ट्राच्या अनेक क्रांतिकारकांनी काळ्या पाण्याची शिक्षा सहन केली. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान आहे,” असे सावंत ट्विटद्वारे म्हणाले.
हेही वाचा >> राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
तसेच पुढे त्यांनी, “१८५७ चा विद्रोह हा हिंदू आणि मुस्लिमांचा एकत्रित लढा होता. सावरकरांनीही ते मान्य केले होते. म्हणून आम्ही १८५७ च्या बंडातील अझीमुल्ला खान यांच्यासह सर्व क्रांतिकारकांची नावे संग्रहालयात पाहू इच्छितो. शेतकरी-कामगारांचा संघर्ष आणि वारली उठाव यांनाही संग्रहालयात स्थान मिळावे,” अशी मागणी केली आहे.