महाविकास आघाडीच्या लोकसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासंदर्भात फक्त बैठका होत आहेत. पण ठोस कोणताही निर्णय होत नाही. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहिर केली. उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली. असे असतानाच संजय निरुपम यांनी मंगळवारी भाजपाचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या भेटीत काय चर्चा झाली? या संदर्भातील कोणतीही माहिती समोर आली नाही.
काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला. यातच आता संजय निरुपम हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे. या सर्व घडामोडीनंतर अखेर भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी संजय निरुपम यांच्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. पण हे स्पष्टीकरण देत असतानाच त्यांनी एक सूचक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : नोकऱ्यांमध्ये आरक्षण ते दरवर्षी १ लाख रुपयांची आर्थिक मदत; काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
अशोक चव्हाण नेमके काय म्हणाले?
“संजय निरुपम हे माझे जुने सहकारी मित्र आहेत. त्यामुळे त्यांची आणि माझी भेट अधून-मधून कुठे न कुठे होत राहते. पण त्यांच्याशी मी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज जनमाणसाचा कौल पाहाता लोकांची मानसिकता आता भाजपाच्या विकसित भारताच्या संकल्पनेमुळे जोडली गेली आहे. लोकांना एकच दिसत आहे, भाजपाशिवाय पर्याय उपलब्ध नाही. भाजपाच देशाला सक्षण नेतृत्व देऊ शकते. ही मानसिकता लोकांमध्ये आहे. त्यामुळे जनता ही भाजपाबरोबर आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.
काँग्रेसचे काही नेते संपर्कात आहेत का?
नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी काँग्रेस सोडत आज (१३ मार्च) भाजपात प्रवेश केला. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “काँग्रेसमधील अनेकांशी माझी चांगली मैत्री आहे. त्यामुळे काँग्रेसमधील मंडळी भेटत राहतात. पण मी त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केली नाही. पण ज्यांना वाटते की आले पाहिजे, त्यांचे स्वागतच आहे. काँग्रेस पक्ष सोडताना मी सांगितले होते की, जबरदस्तीने कोणाला घ्या, किंवा येथे आणा, अशी माझी भूमिका नाही. ज्यांची भाजपात येण्याची इच्छा आहे, त्यांचे मी निश्चितच स्वागत करेल. जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे ज्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी व्हावे. भाजपाला राज्यात आणि देशात चांगले नेतृत्व आहे. देशात पुन्हा भाजपाचे सरकार आले पाहिजे, अशी अनेकांची मानसिकता आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.