Satej Patil On Madhurima Raje : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. आज (४ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी केलेल्या अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर काहींनी मात्र आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यातच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तसेच राजेश लाटकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या काही तासात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यातच मधुरिमाराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. “मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना”, असं म्हणत सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

सतेज पाटील काय म्हणाले?

“निवडणूक लढायची नव्हती तर मग आधीच निर्णय घ्यायला पाहिजे होता. कारण ही माझी पूर्णपणे फसवणूक करण्यासारखं आहे. आम्हाला काही अडचण नव्हती. पण आधीच नाही म्हणून सांगायला हवं होतं. हे चुकीचं आहे, मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे बरोबर नाही. अजिबात बरोबर नाही. मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना”, असं म्हणत सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं?

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघांत कोणाला तिकीट द्यायचं? यावरून चांगलंच राजकारण तापलं होतं. कारण या मतदरसंघात काँग्रेसमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली होती. आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नावाला विरोध झाल्यानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण त्यानंतर आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटांत खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत उमेदवारी मागे घेतली. यानंतर राजेश लाटकर हे चांगले कार्यकर्ते असून त्यांच्यासाठी मधुरिमाराजे यांचा अर्ज मागे घेत असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितलं. मात्र, यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यावरून कोल्हापूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader satej patil on madhurima raje in kolhapur north vidhan sabha election 2024 politics gkt