काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर आता सत्यजीत तांबे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सत्यजीत तांबेंनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार असल्याचं सत्यजीत तांबेंनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया देत आगामी वाटचालीचे संकेत दिले आहेत.
नेमकं झालं काय?
नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून मविआच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका घेतली गेल्यामुळे काँग्रेस आमदार सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्यजीत तांबेंनी नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली. त्यामुळे जिल्हा काँग्रेसपासून थेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसपर्यंत अंतर्गत राजकारण चालू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
‘…आता मलाही आपण एक संधी द्यावी’; सत्यजित तांबे यांचे नागरिकांना आवाहन
काय म्हणाले सत्यजीत तांबे?
काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा कधीच विचार केला नाही, असं सत्यजीत तांबे म्हणाले आहेत. “२२ वर्षं मी काँग्रेसमध्ये काम केलं आहे. जन्मल्यापासून मला फक्त काँग्रेसच माहिती आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. माझ्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही. अनेक लोक अनेक पक्षांमध्ये गेले, आले. मोठे झाले. पण आम्ही कधी तशी भावना ठेवली नाही. आम्ही एकनिष्ठतेनं आम्ही पक्षाबरोबर राहण्याचं काम केलं आहे”, असं तांबे म्हणाले.
“सत्ता माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही”
“२०३० साली माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. माझ्या पणजोबा-आजोबांपासून आम्ही सतत चार चार पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आहोत. सत्ता येतात, जातात. सत्तेची पदं आमच्यासाठी फार महत्त्वाची नाहीत. सत्ता आम्ही जन्मल्यापासून पाहातो आहोत. ८३ सालचा माझा जन्म आहे. ८५ साली थोरात साहेब आमदार झाले. त्याआधी माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हेही आमदार होते. त्यामुळे सत्ता हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा नाही. राजकारणात आपण काय काम करण्यासाठी आलो आहोत, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे”, असंही तांबे म्हणाले.
दरम्यान, निलंबनाच्या कारवाईचं दु:ख असल्याचं तांबेंनी यावेळी म्हटलं. “निलंबित केल्याचं दु:ख आहेच. योग्य वेळी मी त्याला उत्तर देईन.अनेक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बँकिंग कर्मचारी संघटना, अनेक लोक, पदाधिकारी मला पाठिंबा देण्याससाठी इच्छुक आहेत. योग्य वेळी त्यावर मी निर्णय घेईन. राजकारण चाललेलं आहे. सगळं राजकारण होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन”, असं ते म्हणाले.