काँग्रेस व राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा उदयसिंहांचा निर्वाळा

कराड : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्याने आम्ही अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका घेतल्याचे सांगत माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंहांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या हातावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

रयत संघटनेचे नेते उदयसिंह यांच्याकडे कराड तालुक्यातील प्रमुख संस्था असून, ते रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या भूमिकेने राजकीय पटलावरील भूकंप झाला आहे. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, उपमुख्यंत्री अजित पवार यांनी कोयना बँकेला भेट देवून तेथील विलासकाका उंडाळकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. उंडाळकर गटाच्या प्रमुखांशी चर्चा केली. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, अमोल मिटकरी हेही उपस्थित होते.

यानंतर उदयसिंहांनी आपली नवी वाटचाल माध्यमांसमोर मांडली. ते म्हणाले, विलासकाकांनी शेवटपर्यंत काँग्रेसची विचारधारा जोपासली. परंतु,  सध्याच्या राजकीय परिस्थितीत रयत संघटना आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी ही भूमिका घ्याव्या लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचे पुरोगामी विचार डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहेत.

काँग्रेसच्या विचारधारेतूनच ‘राष्ट्रवादी’ची निर्मिती झाली. विलासकाका असतानाची राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यांच्याबरोबर काम करणारे ८० टक्के लोक त्यावेळी ‘राष्ट्रवादी’मध्ये होते. तरीही त्यांच्यात एकमत होत असे. विलासकाकांना त्यांची विचारधारा शेवटपर्यंत जपायची होती. परंतु, विचारधारा जपत असताना संघटना वाढवली नाही, तर त्या विचारधारेला अर्थ उरत नसल्याने आपण ही भूमिका घेतल्याचे उदयसिंहांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी विधानपरिषदेवर संधीसंदर्भात आपणास शब्द दिला किंवा काय यावर ते म्हणाले, असा शब्द त्यांनीही दिला नाही आणि मीही त्यांच्याकडे मागितलेला नाही. विलासकाकांसोबत काम केलेल्या रयत संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी पवारांकडे आपली भूमिका मांडली आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला ताकद द्यावी, एवढीच आमची मागणी आहे.

काँग्रेसवर नाराज नाही

आपण याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून याची कल्पना दिली. ज्या ज्या अडचणी आहेत, त्यावर चर्चाही झाली. मी काँग्रेस नेतृत्व किंवा पक्षावर नाराज नसल्याचे उदयसिंहांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

काम करायला मोठा वाव

अजित पवारांना महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांची पूर्ण जाण असल्याने त्यांच्यासोबत काम करायला मोठा वाव आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होईल,  त्यानंतर अजित पवारांशी बोलून पक्षप्रवेशाचा निर्णय घेणार आहे. ‘महायुती’मध्ये काम करताना घटकपक्षांतील लोकप्रतिनिधींसोबतही निश्चितच काम करावे लागेल, असेही त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

गरज ओळखून प्रवाहासोबत

काँग्रेसची ताकद घटणार का? या प्रश्नावर त्यांनी अनेकजण पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस संपली का? असा प्रतिसवाल केला. एक व्यक्ती जाण्याने कोणताही पक्ष संपत नाही. तसेच राजकारण हे प्रवाहित असते, त्याला बांध घालण्याचा प्रयत्न केल्यास ते खुंटते. त्यामुळे काळाची गरज ओळखून  प्रवाहासोबत जायला हवे, असे त्यांनी सांगितले.

ते काळच ठरवेल

महायुतीतील मित्रपक्षांतील नेत्यांनी तुमचे स्वागत केले आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले माझी चर्चा राष्ट्रवादीबरोबर चालू आहे. त्यामुळे बाकीच्या पक्षांचा काही प्रश्नच येत नाही. तसेच भविष्यात दक्षिणेची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळेल का? यावर ते म्हणाले, मी त्यावर काही बोलणार नाही. काळाच्या पोटात काय आहे? हे काळच ठरवेल. मी अजितदादांकडे काहीही मागितलेले नाही आणि त्यांनीही तसा कोणता शब्द दिला नसल्याचा पुर्नरोच्चारही त्यांनी यावेळी केला.

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील आणि विलासकाकांची मैत्री हा धागा धरून मंत्री मकरंद पाटलांनी ही चर्चा घडवून आणली काय? यावर ते म्हणाले, याचे मूळ मकरंद पाटील हेच आहेत.

अजूनही मी काँग्रेसमध्येच

पक्षप्रवेशानंतर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा लागेल. त्याचबरोबर आज काँग्रेसचा मेळावा आहे. या मेळाव्याला जाणार आहात का? हो मी मेळाव्याला नक्की जाणार आहे. कारण मी अजून काँग्रेसमध्येच असल्याचे  उदयसिंहांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच  हशा पिकला.