Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची आज १२५ वी जयंती आहे. त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार हे होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“खरं तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून आम्ही कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे पाहायचो आणि ते नंतर मुख्यमंत्री देखील झाले. आता आम्ही तुमच्याकडे कर्तुत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आणि हिमंत आहे. त्यामुळे आता तुम्ही (देवेंद्र फडणवीस) सुद्धा नरेंद्र मोदी यांचं वारसदार व्हावं. स्वभाविक आहे. त्यात काही वेगळं नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं.
‘बाजुची खुर्ची घेण्यास फार पटाईत’
भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, “किशोर जोरगेवार यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदनही देतो. खरं तर तुम्ही बाजुची खुर्ची घेण्यास फार पटाईत आहात. राजकारणात हे कौशल्य, काही गोष्टी ज्युनिअरकडून सिनिअरला शिकावं लागतं. ते मी किशोर जोरगेवार यांच्याकडून येथे आल्यापासून शिकलो”, अशी टोलेबाजी विजय वडेट्टीवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला माहिती आहे की चंद्रपूर हा जिल्हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही ‘वार’ असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात नेहमी पुढे असतात”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार, वडेट्टीवार यांच्या नावाचा उल्लेख केला.