पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक आज ( १५ सप्टेंबर ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. यानंतर अजित पवारांनी शरद पवारांसमोर येणं जाणीवपूर्वक टाळल्याची जोरदार चर्चा होत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसत असल्याचं मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (१५ सप्टेंबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “आत्ता तरी न्यायालयीन लढ्यावरून आणि निवडणूक आयोगाच्या पत्रांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत हे स्पष्ट झालं आहे. आता दोघांच्याही दृष्टीने ही अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे त्या दोघांना एकमेकांसमोर तोंड दाखवणे शक्य नसेल. म्हणून अजित पवार शरद पवारांच्याबैठकीला जाणं टाळत असावेत.”
“…म्हणून अजित पवार शरद पवारांच्या मागून जातात”
“अजित पवार म्हणाले की, आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. मात्र, ते शरद पवारांच्या मागून जातात, पुढून जात नाहीत हे मागच्या बैठकीत बघितलं. कदाचित त्यांच्यात शरद पवारांच्या समोरून जाण्याची हिंमत नसेल. म्हणूनच ते शरद पवार हजर असलेल्या बैठकीला उपस्थित राहणं टाळत असावेत,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
हेही वाचा : अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत शरद पवारांच्यासमोर येणं टाळलं? वळसे-पाटील म्हणाले…
“तोच अपराधीपणा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”
“माणसाला अपराधीपणाची भावना वाटत असली, की तो नजरेला नजर मिळवू शकत नाही. तोच अपराधीपणा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि वागण्यातही दिसत आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.