Vijay Wadettiwar : विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. निवडणुकीचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबत आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
तसेच काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात अपक्ष आणि छोटे पक्ष महत्वाचे ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, विधानसभेच्या निकालाआधीच काही राजकीय नेते सत्तास्थापनेबाबत दावे करत आहेत. याबाबत आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. “नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही”, असं म्हणत महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल, असा दावा केला आहे.
हेही वाचा : अॅक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये भाजपा-महायुतीला १७८ जागांचा अंदाज, मविआला किती जागा?
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकू. या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडफोड करून हे सरकार बनवलं होतं.एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. त्यामुळे २३ तारखेपर्यंत आपण सर्वांनी निकालाची वाट पाहाव. निकालात काय ते स्पष्ट होईल. मी यावर जास्त भाष्य करणार नाही. अशा कंपन्या काम करत असतात त्यांचे अंदाज वर्तवत असतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात १६५ जागा जिंकत आहे.
“नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत निर्णय घेऊ. माध्यमांनी प्रश्न विचारल्यामुळे संजय राऊत यांच्या तोंडून तसा शब्द निघाला असेल. मात्र, आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचय असं कधीच म्हटलेलं नाही”, असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दिलं.