Vijay Wadettiwar : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता आघाडीत खटके उडत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तीन ते चार दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी तुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असतानाच आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची मोठी घोषणा केली.

त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच संजय राऊत यांनी महापालिकेबाबत केलेल्या विधानानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा”, असं विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“असं आहे की संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली असेल. पण तरीही आम्ही एकदा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवू. मात्र, ते नाही म्हटले तर आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे. आम्ही काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अनेक वर्ष युती राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही मग दोन्ही पक्ष (काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी)मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करू”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

‘माझ्या विधानाचा विपर्यास…’: विजय वडेट्टीवार

“इंडिया आघाडी आताही मजबूत आहे. दिल्लीत इंडिया आघाडीला कुठेही धक्का नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. आता काल माझ्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला. मी असं म्हणालो होतो की, नाना पटोले आणि संजय राऊत व आम्ही देखील त्यामध्ये होतो. २० दिवस आम्ही जागा वाटपाच्या चर्चांमध्ये घालवले. जागा वाटप करत असताना २० दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. त्यामुळे आम्हाला धक्का बसला असं मी म्हटलं होतं. मात्र, माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

महापालिकेसंदर्भात ठाकरे गटाने काय घोषणा केली?

“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचं असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

Story img Loader