महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा केलेलं उपोषण. तसंच मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचं सुरु असलेलं साखळी उपोषण आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली २४ डिसेंबरपर्यंतची मुदत. छगन भुजबळ यांनी बीडमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. एकीकडे छगन भुजबळ यांनी ही भूमिका मांडली असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरसकट कुणबी प्रमाणपत्राला आमचा विरोध आहे असं म्हटलं आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. सरसकट आरक्षण देण्यास आमचा आधीही विरोध होता आणि आत्ताही आहे. कुणबी नोंदणीचं काम शिंदे समितीला दिलं आहे. ओबीसींमध्ये समाविष्ट होणाऱ्या जाती त्यांनी शोधाव्या आणि श्वेतपत्रिका काढावी.” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
आम्ही राणे समिती स्थापन केली होती. त्यानंतर गायकवाड समिती आली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कोणतीही जात मागास ठरवायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया आहे. ती राबवली गेली पाहिजे. जर सिद्ध झालं की ते मागास आहेत तर त्यांना आरक्षण द्यायला कुणाचीच ना नाही. छगन भुजबळ एक भूमिका मांडत आहेत आणि शंभूराज देसाई वेगळं बोलत आहेत. असं असू नये, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रातील कुणबींच्या नोंदी तपासण्यात येत आहेत. आता जी मागणी येते आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. यावर सरकारची भूमिका काय? ते स्पष्ट झालं पाहिजे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई यांना लावायची आहे का? असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला आहे. मी ओबीसी आहे मला हेच वाटतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास माझा याआधीही विरोध होता आणि आत्ताही आहे.
“शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात. ते कोण आहेत? ते ओबीसी आहेत. का होतात? कारण ओबीसीमुळे सर्व काही मिळतं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. अरे हेच समाजाला अपुरं आहे. तुम्ही येणार तर वाढवून घ्या. वेगळा प्रवर्ग घ्या. तुम्ही ५० टक्केच्या आतमध्येची मागणी करताय. हा निर्णय सरकारने जाहीर केलाय. मग वाढवून द्या. ओबीसी समाजाला दुखवू नका. मराठा समाजालाही दुखवू नका. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावं अशी आमचीदेखील भूमिका आहे. सरकार सरकार म्हणून जी भूमिका मांडायला हवं ती मांडताना दिसत नाही”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.