शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. राज्यभरात भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाईसाठी आंदोलनंही होत आहेत. यानंतर आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा मोठा दावा केला आहे. त्या रविवारी (३० जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “हा माणूस इतका घाणेरडा आहे. संभाजी भिडे ज्या भागातून येतात तेथे फोन लावला आणि हा कसा माणूस आहे असं विचारलं. तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितलं की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय. दुसरीकडे सरकार त्यांना खुलेपणाने फिरू देत आहे.”

हेही वाचा : “संभाजी भिडे दरवेळी वादग्रस्त वक्तव्ये करतात, त्यामुळे मी एकनाथ शिंदेंना…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“संभाजी भिडेंवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजे”

“आम्ही संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करा म्हणून आग्रह धरला तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. संभाजी भिडेंवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे असंच करत राहिले आणि समाजात अशांतता पसरवली, १५ ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला, तर याला जबाबदार गृहखातं, पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

“संभाजी भिडेंचं देशासाठी काय योगदान?”

संभाजी भिडेंनी पंडित नेहरूंवर केलेल्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “पंडित नेहरूंचं देशासाठी नखाइतकंही योगदान नाही असं संभाजी भिडे (मनोहर कुलकर्णी) म्हणतात, मग यांनी योगदान दिलं आहे का? नेहरू देशासाठी ११ वर्षे तुरुंगात होते. ११ वर्षे तुरुंगात असलेल्या व्यक्तिला हे असं कसं बोलू शकतात. ते युवकांची डोकं खराब करत आहेत. युवकांची पिढी खराब करण्याचं याचं षडयंत्र आहे. हे आम्ही होऊ देणार नाही.”

हेही वाचा : संभाजी भिडेंवर ‘या’ कलमांनुसार कारवाई होऊ शकते, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“संभाजी भिडे काय दुधाने धुतले आहेत का?”

“हे लोक निर्लज्जासारखे वागत आहेत. पोलिसांनी संभाजी भिडेंवर कारवाई केली पाहिजे. त्यांना अटक का होत नाही? त्यांनी काहीही बरळायचं, महात्मा गांधी, महात्मा फुलेंचा अपमान करायचा. साई बाबांना काहीतरी बोलायचं, पंडित नेहरूंबद्दल काही तरी बोलायचं आणि हे काय दुधाने धुतले आहेत का?” असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader yashomati thakur big claim about sambhaji bhide afzal khan pbs
Show comments