राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून रोहित पवार सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, गुरुवारी (२८ सप्टेंबर) रोहित पवारांच्या एका कंपनीवर राज्य सरकारने कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या प्रदूषण मंडळाने रोहित पवारांना नोटीस बजावली आहे. रात्री दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईनंतर रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. सत्तेतील दोन बड्या नेत्याच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली, असा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवारांच्या कारवाईवर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सूडबुद्धीने कारवाई होतेय, या रोहित पवारांच्या वक्तव्याला ठाकुर यांनी समर्थन दिलं आहे.
हेही वाचा- “अजित पवारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर…”, गुणरत्न सदावर्तेंचं विधान
रोहित पवारांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे का? असं विचारलं असता यशोमती ठाकुर म्हणाल्या, “बिलकुल, मला पण तेच वाटतंय. रोहित पवार आता सक्रिय झाले आहेत. जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं आहे. तेव्हापासून रोहित पवार अजून जास्त मोठ्या प्रमाणावर काम करतायत. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्हाला विश्वास रोहित पवार हे युवा नेते आहेत. ते त्या दबावाला बळी पडणार नाहीत. त्यांचे जे विचार आहेत, त्या विचारांबरोबर ते राहतील, अशी अपेक्षा आहे.”
हेही वाचा- “जनसंघापुढे शरद पवारही चिल्लर”, गुणरत्न सदावर्तेंची सडकून टीका
रोहित पवारांनी नेमके काय आरोप केले?
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु, अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.