अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार कक्ष मिळवण्यासाठी विनंती करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी खासदार कक्षाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतले होते. या कार्यालयाच्या मुद्द्यावरून यशोमती ठाकूर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला होता. मात्र, यानंतर हे खासदार कार्यालय प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे.

दरम्यान, खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केल्याप्रकरणी खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता या सर्व घडामोडींवर काँग्रेसच्या नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केला आहे. “आमचा खासदार मागासवर्गीय असल्याने त्यांना अशी वागणूक दिली जात आहे”, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. यामागे खासदार अनिल बोंडे आणि रवी राणा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा : मनोज जरांगेंच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके आक्रमक, “आरक्षण हा खिरापत वाटण्याचा कार्यक्रम….”

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयमधील खासदार कार्यालयाच्या वादावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “४ जूनला निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर ५ जून रोजी नवनिर्वाचित खासदारांनी कार्यालयासंदर्भात प्रशासनाला एक पत्र दिलं. मात्र, त्यानंतर दिरंगाई करण्यात आली. खासदारांनी कालच्या बैठकीत पालकमंत्र्यांना विनंती केली. पण पालकमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली. आमचे खासदार मागासवर्गीय आहेत. त्यामुळे वेगळी वागणूक देण्यात आली”, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

“खासदार अनिल बोंडे आणि रवी राणा हे यामागे आहेत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. पण आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता गुन्हा का दाखल करण्यात आला? तर आमचा खासदार त्या कार्यालयात बसू नये. काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी बसू नये. पण आम्ही घाबरत नाही. आज तुमची सत्ता आहे उद्या आमची सत्ता येईन. खूप काम करायचं आहे. मात्र, कामात अडथळे आणण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत”, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

…तर महाविकास आघाडी सहन करणार नाही

पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या, “जिल्हाधिकारी कार्यालयात जे कार्यालय खासदांसाठी उपलब्ध करण्यात आले. ते फक्त लोकसभेच्या खासदारांसाठी असल्याचं पत्रकात म्हटलेलं आहे. आता रवी राणा यांनी काही आरोप केले आहेत. मात्र, ते आरोप हास्यास्पद आहेत. इतकं मोठं जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्या ठिकाणी दोन खासदारांना दोन कार्यालय देऊ शकले असते. पण महाविकास आघाडीचे खासदार आहेत. आमचे खासदार मागासवर्गीय आहे, म्हणून ही वागणूक देत असताल तर महाविकास आघाडी सहन करणार नाही”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

टेबल टाकून लोकांची काम करणार

“जे कार्यालय सील करण्यात आलं ते दडपशाहीखाली करण्यात येत आहे. मात्र, आमचं काम ते थांबवू शकणार नाहीत. आम्ही काम करत राहणार आहोत. त्या कार्यालयाबाहेर टेबल टाकून लोकांची काम करू”, असं यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.