लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली असून पक्षनिरीक्षकांनी मतदारसंघातील काही निवडक लोकांच्या भेटी घेतल्या. जिल्हय़ात काँग्रेसची यंत्रणा ढेपाळत असून पक्षनिरीक्षकांनाही विद्यमान खासदारांबद्दल तक्रारी ऐकून घ्याव्या लागल्या.
सार्वत्रिक निवडणुकीस अजून १६ महिने बाकी असले, तरी राजकीय पक्षांनी आतापासूनच डावपेच आखणीस सुरुवात केली आहे. २००९ च्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांच्याकडे राज्याचे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यांनी लातूरची जागा खेचून आणण्यासाठी नाना डावपेच आखले. सगळे फासे योग्य पडल्यामुळेच जयवंतराव आवळे अवघ्या ७ हजार ९७५ मतांनी निवडून आले. लातूर शहर व ग्रामीण हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित निलंगा, अहमदपूर, उदगीर व लोहा मतदारसंघांत मात्र काँग्रेसची पीछेहाट झाली. त्या वेळी लोहय़ाचे प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेस समर्थक होते. नव्या व्यूहरचनेत ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. जिल्हय़ाच्या प्रचाराची सूत्रे दिलीपराव देशमुख यांनी राबवली होती. त्यांची प्रकृती आता किती साथ देते, त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. तसेच आता विलासराव नसल्यामुळे मते कोणासाठी द्यायची, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी घेणारा व तो निभावू शकणारा सक्षम पुढारी काँग्रेसकडे नाही. काँग्रेसने लातूरवर बाहेरचा उमेदवार लादला हे शल्य लोकांच्या मनात बोचते आहे. शिवाय गेल्या साडेतीन वर्षांत खासदार आवळे यांनी विलासराव देशमुखांसोबत कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापलीकडे काही केले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मोठी नाराजी आहे. काँग्रेसला आता नव्याने उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. सर्व गट-तटांना मान्य होईल, असा उमेदवार मिळणे हीही कसरतच आहे. भाजप-शिवसेनेत यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही. आता गोपीनाथ मुंडे यांच्याकडे भाजपच्या निवडणूक प्रचाराची राज्याची धुरा राहील. लातूरकडे आपण अधिक लक्ष देणार असल्याचे मुंडेंनी घोषित केल्यामुळे व मागील निवडणुकीतील विजय निसटल्यामुळे त्याचे उट्टे काढण्यासाठी मुंडे आपले सगळे डावपेच आखतील. जिल्हय़ात भाजपची यंत्रणाही अतिशय विस्कळीत आहे.
उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव वगळता एकही आमदार नाही. कोणतीही नगरपालिका ताब्यात नाही. शिवसेनेची स्थिती तर त्यापेक्षा वाईट. असे असले, तरी सामान्य लोकांचा काँग्रेसवर प्रचंड राग आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी सर्वाचे अंदाज मोडीत काढत विक्रमी मतदान घेतले होते. भाजप त्यांना या वेळी पुन्हा संधी देणार की नवा चेहरा देणार? याचीही उत्सुकता आहे. भाजपने उमेदवार निश्चितीपासून मतदारसंघाकडे लक्ष देण्याचे ठरवले तर काँग्रेसला आपली जागा सांभाळणे अवघड जाणार आहे. अर्थात, ऐन वेळी किती उमेदवार रिंगणात राहतील, जाती-पातीचे राजकारण काय घडले? यावर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत. तूर्तास या वेळी ‘आवळा देऊन कोहळा’ काढण्याची संधी काँग्रेसला मिळेल, अशी चिन्हे दिसत नाहीत.
विद्यमान खासदारांविषयी नाराजी,लातुरात नव्या उमेदवाराचा शोध!
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली असून पक्षनिरीक्षकांनी मतदारसंघातील काही निवडक लोकांच्या भेटी घेतल्या. जिल्हय़ात काँग्रेसची यंत्रणा ढेपाळत असून पक्षनिरीक्षकांनाही विद्यमान खासदारांबद्दल तक्रारी ऐकून घ्याव्या लागल्या.
First published on: 30-11-2012 at 04:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress looking new mp candidate for latur