नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघावरचे भाजपचे पारंपरिक वर्चस्व मोडून काढण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या असून पुढील वर्षी होणारी निवडणूक गांभीर्याने घेण्याचे सूतोवाच केले आहे. सध्या भाजपचे नितीन गडकरी या मतदारसंघाचे विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करीत असून, त्यांची मुदत २०१४ साली जुलै महिन्यात संपत आहे. गडकरी नागपुरातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याने पदवीधर मतदारसंघात त्यांच्या जागी भाजप पर्यायी आणि जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहे. उमेदवार निवडीत गडकरींचाच शब्द अखेरचा ठरणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे काँग्रेसला गडकरींशीच मुकाबला करावा लागणार आहे.
भाजपचा उमेदवार कोणीही राहिला तरी यावेळी ही जागा भाजपकडून खेचून आणण्याचे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहेत. काँग्रेसने बबनराव तायवाडे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तायवाडे गेल्या निवडणुकीत गडकरींकडून पराभूत झाले होते. तायवाडेंविरुद्ध लढण्यासाठी भाजपजवळ गडकरी वगळता तोडीचा उमेदवार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर गडकरी सतत या मतदारसंघातून निवडून येत आहेत. ही जागा काँग्रेसला अद्याप जिंकता आलेली नाही. त्यामुळे बुधवारी पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन या मुद्दय़ावर उहापोह केला. काँग्रेसच्या बैठकीत गडकरींना घेरण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघात जास्तीत जास्त मतदार नोंदविण्याचे निर्देश सर्वाना देण्यात आले. या बैठकीत गडकरींना लक्ष्य करण्यात आले होते. नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनीही गडकरींवर टीका करण्याची संधी सोडली नाही. परंतु, त्यांनी गडकरीविषयी केलेले शब्दप्रयोग काँग्रेस नेत्यांना रुचले नसल्याचे काहींनी खाजगीत सांगितले.
गडकरींनी १९८८, १९९०, १९९६, २००२ आणि २००८ अशी पाचवेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.