शिवसेना खासदार महाराष्ट्र सदनातील भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करीत असताना त्याची चौकशी काँग्रेस आघाडी शासनाने केली नाही. उलट महाराष्ट्र सदनात घडलेल्या चपाती प्रकरणाला त्यांनी जातीय रंग दिला, अशी तोफ डागत केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सेना खासदारांना त्यांच्या मनात तसे काही नव्हते, असे सांगत स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले.
शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या गडकरी यांच्या उपस्थितीत सायंकाळी स्वामिनारायण मंदिर सभागृहात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या वेळी त्यांनी महाराष्ट्र सदनातील वादाचे खापर काँग्रेसच्या डोक्यावर फोडले. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक शहरात साकारलेल्या उड्डाण पुलावरून त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले. वास्तविक, या उड्डाण पुलासह महामार्ग विस्तारीकरणाच्या कामास वाजपेयी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली होती. परंतु, भुजबळ त्याचे श्रेय लाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचे विक्रम करून अनेक प्रश्न निर्माण केले. राज्यातील शासनही दृष्टिहीन आहे. देशात मध्य प्रदेशचा कृषी विकास दर सर्वाधिक असून महाराष्ट्र खूप मागे पडला आहे, असेही ते म्हणाले. कांद्याचे उत्पादन वाढल्यानंतर निर्यातमूल्य कमी होईल. कांदा साठवणुकीसाठी नवीन योजना आखण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या मेळाव्याआधी गडकरी यांच्या हस्ते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले. देशातील दळणवळण व्यवस्थेला नवीन आयाम देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग सिमेंट क्राँक्रीटचे बनविण्याचा विचार असून त्या अनुषंगाने परदेशातील रस्त्यांचा अभ्यास केला जात आहे. सिमेंटच्या वापराने या कामाचा खर्च वाढणार आहे. त्यासाठी परदेशातील बँकांनी गुंतवणूक करावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या वेळी ‘भारतीय बांधकाम व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना कानपिचक्या दिल्या. रस्त्यांच्या विकासासाठी टोलवसुलीचे त्यांनी समर्थन केले परंतु, रस्त्याची डागडुजी वा व्यवस्थापन केले जात नसल्याचे टोल आकारणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडकरी यांनी ओझर येथील नाशिक विमानतळाची पाहणी केली. हे विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या परवानग्यांचा प्रश्न केंद्रीय आस्थापनांकडे प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने गडकरी यांनी प्रयत्न करावेत, असे साकडे संघटनेकडून घालण्यात आले.
काँग्रेसकडून ‘चपाती’ प्रकरणाला जातीय रंग – नितीन गडकरी
शिवसेना खासदार महाराष्ट्र सदनातील भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करीत असताना त्याची चौकशी काँग्रेस आघाडी शासनाने केली नाही. उलट महाराष्ट्र सदनात घडलेल्या चपाती प्रकरणाला त्यांनी जातीय रंग दिला
First published on: 26-07-2014 at 06:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress make maharashtra sadan issue communal nitin gadkari