मागच्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अविश्वसनीय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना पक्षातून ४० हून अधिक आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्यांचा गटच शिवसेना पक्ष असल्याचे सांगितले. त्यानंतर मागच्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही असाच मार्ग निवडला. दोन्ही नेत्यांचे दावे निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी खरे ठरवले. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील भाजपामध्ये गेले आहेत. त्यामुळे जे शिवसेना-राष्ट्रवादीचे झाले, ते काँग्रेसचे होणार का? असा एक प्रश्न विचारला जात होता. भाजपा नेते अशोक चव्हाण यांनीच यावर आता थेट उत्तर दिले आहे.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात अशोक चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याची कारणे, देशभरातील राजकीय परिस्थिती आणि भाजपामधील जबाबदारीबाबत सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांना काँग्रेसचाही शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणे गट पडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “काँग्रेसमध्ये तसं होऊ शकत नाही. मी काँग्रेस सोडत असताना एकालाही माझ्याबरोबर या म्हणून सांगितले नाही. माझ्या संपर्कात अनेक लोक आहेत, ज्यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत. पण त्यांच्यापैकी एकालाही मी माझ्यासोबत निर्णय घ्या, असे सांगितले नाही. कारण त्यांचे करियर मी धोक्यात घालू इच्छित नाही.”
“माझं येणं आणि नारायण राणेंचं जाणं…”, अशोक चव्हाणांनी सांगितली भाजपाची निवडणुकीची योजना
“काँग्रेसमधील विद्यमान नेत्यांच्या मनातलं समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की, त्यांना भवितव्याची चिंता सतावते. पुढच्या काळात होईल, हे सांगणे कठीण आहे. पण अनेक नेत्यांच्या मनात चिंता आहे”
नाना पटोलेंनी ती घोडचूक केली
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे, ही सर्वात मोठी घोडचूक होती, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. नाना पटोले यांच्या राजीनाम्याबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. काही मोजक्या नेत्यांबरोबर ही चर्चा झाली होती. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित ठाकरे सरकार पडले नसते. महाराष्ट्राच्या राजकारणाला जी कलाटणी मिळाली, ती नाना पटोलेंच्या निर्णयामुळे मिळाली, अशीही टीका अशोक चव्हाण यांनी केली.
काँग्रेसचं भवितव्य काय?
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. पण काँग्रेस पक्षात अजूनही फार काही हालचाल दिसत नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसचे नेतृत्व अतिशय योग्य पद्धतीने केले होते. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका असतील किंवा २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले काम करून दाखविले. पण एकूणच काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती योग्य दिसत नाही. गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस सत्तेत नाही. तिथे जमिनीवरील काँग्रेस संघटन संपुष्टात आले आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती उद्भवल्याचे दिसत आहे, अशीही प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.