आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. आज विरोधी आमदारांची संख्या कमीच होती. सुरुवातीला सांगितलं गेलं की एकनाथ शिंदे जाणार आहेत. आमचा विश्वास बसला नव्हता. पण शिंदे गेले, त्यानंतर राष्ट्रवादी फुटणार अशी चर्चा होती. ते पण खोटं वाटलं होतं. पण अजित पवारच पक्ष घेऊन गेले. आता काँग्रेस फुटणार आहे अशी चर्चा आहे. कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही की नेमकं काय होऊ शकतं? असं अबू आझमींनी म्हटलं आहे.
भरवसा नसलेल्या राजकारणारवर काय बोलायचं?
ज्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हत्या, त्या झाल्या. काहीही भरवसा नाही त्यामुळे या राजकारणावर काय बोलायचं? असं अबू आझमी म्हणाले. त्याचप्रमाणे स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे अशीही मागणी अबू आझमी यांनी केली. सध्याच्या घडीला चित्र असं आहे की विरोधी पक्ष नेता जो जोरकसपणे विरोधकांची बाजू मांडतो तोच गेला तर मग काय करणार? विरोधी पक्षनेताच सत्तेत जाऊन बसल्यावर आता काही सांगता येणार नाही. आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे असंही अबू आझमींनी म्हटलं आहे. आमची कुणाशीही चर्चा सुरु नाही असंही आझमी यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा! विधानसभेत येताना केलेली ‘ही’ कृती सगळ्यांनाच भावली
समान नागरी कायद्याला विरोध
आपल्या देशात विविधेतून एकता आहे. त्यामुळे समान नागरी कायदा या देशात कसा आणता येईल? या देशात विविध धर्मांचे लोक राहतात. जर एकाच धर्माचे लोक राहात असते तर हा कायदा आणणं योग्य होतं. पण जे लोक बहुसंख्य आहेत ते अल्पसंख्य समाजाला हे दाखवू पाहात आहेत की आम्ही हे करु शकतो. मुस्लिम लोकांना आम्ही बरबाद करुन आम्ही मतं घेऊ शकतो हे त्यांना दाखवायचं आहे. जर देशात वेगळ्या धर्माचे लोक आहेत तर कायदे वेगळे असलेच पाहिजेत. सध्या २०२४ ची निवडणूक जिंकायची आहे म्हणून हे सगळं चाललं आहे असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
नितेश राणेंवर टीका
या अधिवेशनात आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणणार असं नितेश राणे म्हणाले. त्यावर विचारलं असता अबू आझमी म्हणाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर कायदा आणू असं नितेश राणे म्हणाले असते तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत केलं असतं.