सोमवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खास शैलीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. आजही अनेकांची सुई २०१४ वरच अडकली आहे. काँग्रेसच्या वृत्तीवरून असे दिसते की त्यांना पुढील १०० वर्षे सत्तेवर यायचे नाही, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. काँग्रेसवर टीका करताना, १९९४ मध्ये तुम्ही पूर्ण बहुमताने गोवा जिंकला होता. २८ वर्षे झाली गोव्याने तुम्हाला स्वीकारले नाही. गेल्या तीन दशकांपासून तुम्ही त्रिपुरातून जिंकलेला नाहीत. १९७२ मध्ये बंगालमध्ये तुम्हाला सत्ता दिली होती. १९८९ पासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकांनी तुम्हाला पसंत केलेले नाही. तामिळनाडूच्या जनतेने तुम्हाला १९६२ मध्ये म्हणजे ६० वर्षांपूर्वी संधी दिली होती. तेलंगणाच्या निर्मितीचे श्रेय तुम्ही घेता, पण तेथील जनतेने तुम्हाला स्वीकारले नाही. झारखंडच्या स्थापनेला २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण तिथे काँग्रेस फक्त चोर दरवाजातूनच सत्तेत येते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन करोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही (काँग्रेस) लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही देशभर करोना पसरवला’’, असा आरोपही मोदींनी केला होता.
“सॉरी सर, जीव धोक्यात घालून लोकांना…”; पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेस आमदाराचे प्रत्युत्तर
त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी मिनिटांच्या भाषणात ५० वेळा काँग्रेसचे नाव घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. “काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या मोदींनी आपल्या ६० मिनिटांच्या भाषणात ५० वेळा काँग्रेसचे नाव घेतले! खौफ अच्छा हैं!,” असा टोला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने अचानक लागू केलेल्या टाळेबंदीमुळे लाखो मजूर व गोरगरिबांचे हाल झाले. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकारने केली होती. अडकून पडलेल्या ५० हजार मजुरांना काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने आपापल्या गावी परत पाठविले होते. केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यानेच आम्ही मदत केली व त्याचा आम्हाला अभिमान, असे प्रत्युत्तर महसूलमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर दिले.