आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मंत्र्यांना उतरविण्याची तयारी काँग्रेसने दाखविली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत, तरीदेखील कुठे गरज पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे काँग्रेसही राज्यातील आपल्या काही मंत्र्यांना निवडणुकीच्या िरगणात उतरवील. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.
पेण येथे आयोजित काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यासाठी माणिकराव ठाकरे आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांकडे प्रदर्शित केली आहे. या संदर्भात माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही पण गरज वाटली तर पक्ष या मंत्र्यांना निवडणूक लढविण्याचे आदेश देईल, असे ठाकरे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप चर्चा झालेली नाही. या संदर्भात १२ ऑगस्टला होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
या बैठकीत २००४ व २००९ नुसार जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा होईल त्या वेळी कुणी किती आणि कोणती जागा लढवायची याचा निर्णय घेतला जाईल त्याच वेळी आम्ही आमची यादी जाहीर करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेची रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली नाही.
पेण विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याच्या चर्चेत काही तथ्य नाही. पेणची जागा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तेथे कुणाचा क्लेम असण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
काँग्रेस सरकारने केलेली विकासकामे आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभर वचनपूर्ती मेळावे आयोजित केले आहेत. हे मेळावे आटोपल्यानंतर येत्या २१ तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत व्हिजन-२०१४ चा आराखडा तयार करण्यात येईल त्या वेळी पुढील चार महिन्यांत गावपातळीवर, तालुकापातळीवर कोणता कार्यक्रम राबवायचा याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या जातील, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader