Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths: नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यापाठोपाठ आता त्याच रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत एका रात्रीत आणखी ७ रुग्ण दगावल्याची बाब समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नांदेडचे आमदार अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा आता ३१वर गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

शंकरराव चव्हाण रुग्णालयात २४ रुग्ण दगावल्याची बाब सोमवारी उघड झाली. एका दिवसात इतके रुग्ण दगावल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. औषधांच्या तुटवड्यामुळे आपले रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांकडून केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, असं काहीही नसून गंभीर आजार असणारे रुग्ण दाखल झाले, त्यांच्यावर पूर्ण उपचार केले मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मात्र, आता आणखी ७ रुग्णांचा मृ्त्यू झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

“नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान चालूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी”, अशी पोस्ट अशोक चव्हाण यांनी एक्सवर केली आहे.

“नांदेड रुग्णालयातील मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे नाहीत”, अधिष्ठातांनी दिली माहिती; मृत्यूमागचं सांगितलं कारण

“शासकीय पातळीवर इच्छेचा अभाव”

दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. “आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय अधिष्ठात्यांनीच आमच्या लोकांना दिली आहे. झालं ते गंभीरच आहे. पण आत्ता गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना वाचवायला हवं. शासनाकडून त्यांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला हव्या. पण शासकीय पातळीवर ही इच्छा दिसत नाहीये”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“तीन तीन इंजिनं लागूनही…”, राज ठाकरेंचा नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर हल्लाबोल…

“अतिशय गंभीर स्थिती आहे. मला राजकीय टीका-टिप्पणी करायची नाहीये. पण शासनाकडून कोणताही प्रतिसाद दिसत नाहीये. असा निष्काळजीपणा लोक सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त निर्देश देऊन चालणार नाही. करोना काळात ज्या प्रमाणे युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात आली, तेवढीच तीव्रता आत्ताही आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla ashok chavan claims 7 more patients died in nanded hospital appeals to cm eknath shinde pmw