बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली आहे. दर्यापूरचे आमदार तिवसा मतदारसंघातील आमदारांच्या ( यशोमती ठाकूर ) चपला उचलण्याचं काम करतात, असं टीकास्र रवी राणा यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर सोडलं आहे. याला बळवंत वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रवी राणा काय म्हणाले?
“दर्यापूरचे आमदार ( बळवंत वानखेडे ) तिवसा मतदारसंघातील आमदारांच्या ( यशोमती ठाकूर ) चपला उचलण्याचं काम करतात. जनतेनं आमदार बनवलं आहे, पण चपला कोणाच्या उचलता? नेत्यांच्या खुर्चीला लाथ मारून काम करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला मर्द आमदार म्हणतात,” असं रवी राणा यांनी म्हटलं.
हेही वाचा : “…म्हणून भुंकण्यासाठी भास्कर जाधवांचा पट्टा काढला असणार”, भाजपा नेत्याची टीका
याला प्रत्युत्तर देताना बळवंत वानखेडे म्हणाले, “बडनेराच्या आमदारांनी ( रवी राणा ) मला स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही. मी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार आहे. स्वाभिमान माझ्या रक्तात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर निवडून आले. शरद पवारांना बाप म्हणणारे मोदींना बाप समजत आहेत. जात प्रमाणपत्र वाचवण्यासाठी मोदी-शाहांच्या मांडीवर जाऊन बसले.”
हेही वाचा : “मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदेंकडून भाजपा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप
“हा माझा नाहीतर माझ्या समाजाचा अपमान आहे. मलाही खालच्या स्तरावर जाऊन टीका करायला येते. मला स्वाभिमान शिकवण्यापेक्षा आपण किती स्वाभिमानी आहात, हे पाहिलं पाहिजे. सगळ्या जनतेला तुमची नौटंकी माहिती आहे. हिंमत असेल, तर राजीनामा देऊन स्वाभिमान जागृत ठेवावा,” असं आव्हान बळवंत वानखेडे यांनी रवी राणा यांना दिलं आहे.