काँग्रेस आणि भाजपा हे दोन पक्ष राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. भाजपा सध्या सत्तेत आहे, तर काँग्रेस विरोधी पक्षाच्या खुर्चीत आहे. या दोन पक्षांमधील अनेक नेत्यांमधून विस्तव जात नाही. अशातच या पक्षांमधील नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं तर आपोआप लोकांच्या भुवया उंचावतात. अशीच घटना सध्या जालन्यात पाहायला मिळाली आहे. काँग्रेस नेते आणि जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतंच भाजपाचे राज्यातले वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कौतुक केलं आहे.
जालन्यात एका कार्यक्रमात बोलताना गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांचं कौतुक केलं आहे. कैलास गोरंट्याल म्हणाले, जालन्यात अनेक विकास योजना आणण्यात रावसाहेब दानवेंचं योगदान आहे. त्यामुळे जालना शहरवासी आणि मतदार संघातील लोकांच्या वतीने मी रावसाहेबांचे आभार मानतो.
हे ही वाचा >> “मी भाजपाची, पण पक्ष माझा नाही”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “गोपीनाथ मुंडेंनाही…”
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, आपण विकासकामांबद्दल बोलायचं झाल्यास किंवा जिल्ह्याच्या विकासाचा विषय येतो तेव्हा आपोआप रावसाहेब दानवे यांचं नाव येतं. याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला हवेत. जालना लोकसभेचं प्रतिनिधीत्व करता करता रावसाहेब दावने मंत्री झाले. २०१४ नंतर दानवेसाहेब मंत्री झाल्यानंतर आपल्या जालना शहराचं स्वरूप बदलत गेलं.