शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांनी संभाजी भिंडेवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता संभाजी भिडेंचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
संभाजी भिडेंवर वडेट्टीवार यांची आगपाखड
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या विधानांवर विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी आगपाखड केली. “जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही, अशा गलिच्छ शब्दांमध्ये या नालायक माणसाने वक्तव्य केलं आहे. त्यांचे शब्द ऐकले, तर असेल तिथून त्यांना उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे. बहुजनांचा, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रपित्याचा अपमान करणं, त्याहीपलीकडे जाऊन जिथे स्वत: या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले, त्या साईबाबांचा अपमान केला जात आहे. या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांचाही अपमान या नालायक माणसानं केला आहे. यावरूनच या माणसाची लायकी दिसते”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“माझा फडणवीसांना प्रश्न आहे, की ते कधी…”
“त्याची जागा कोठडीत आहे. त्याच्यावर कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे. या देशातली जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलमध्ये टाकणार आहात? नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करावा लागेल”, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
“संभाजी कसला? हे तर टोपणनाव”
दरम्यान, मराठी तरुणांना भुरळ घालण्यासाठी संभाजी हे टोपणनाव वापरत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी कला. “संभाजी कसला हा? टोपणनाव वापरून मराठी मुलांना भुरळ घालण्याचं काम तो करतोय. त्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे? तो नेहमीच विष का ओकतोय? जातीय तेढ निर्माण व्हावी, मतांचं विभाजन व्हावं व सत्ताधारी भाजपाला फायदा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. समाजात, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणं, काँग्रेसला डिवचणं, महापुरुष, राष्ट्रपुरुष, महात्म्यांचा अपमान करणं आणि आरएसएसच्या लोकांचं गुणगान करणं हे ते सातत्याने करत आहेत”, असंही वडेट्टीवार म्हणाले.
Fact Check: संभाजी भिडेंच्या नावाने खोटी पोस्ट व्हायरल; नेमकं सत्य काय?
“यांचं मूळ कितीही कुणी नाकारलं, तरी भाजपाला पोषक असंच आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत आहे. त्यामुळे यांचा बोलविता धनी सत्तापक्ष आहे हे आता सांगायची गरज नाही”, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.