गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची देशभरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधारी टीका करण्यासाठी या यात्रेची चर्चा करत आहेत, तर विरोधक समर्थन करण्यासाठी यात्रेवर बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर यात्रेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाला यात्रेवरून खोचक टोला लगावला आहे. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधींच्या यात्रेचं स्वरूप सांगताना ही यात्रा अकोल्यासह महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमधून जाणार असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जाणार आहे. आमचं भाग्य आहे की ती यात्रा अकोल्यातूनही जाणार आहे. त्यानुसार, नाना पटोले इथे येणार आहेत. या यात्रेदरम्यान अकोल्यात राहुल गांधींची सभादेखील होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

“भाजपालाही वाटलं नव्हतं की…”

दरम्यान, पत्रकारांनी भाजपाही अशाच स्वरूपाची यात्रा काढणार असल्याबाबत विचारणा केली असता प्रणिती शिंदेंनी भाजपाला टोला लगावला. “राहुल गांधींच्या यत्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपानं धसका घेतला आहे. त्यामुळे आमची यात्रा निष्प्रभ करण्यासाठी ते वेगवेगळ्या योजना बनवत आहेत.काही वृत्तवाहिन्या मॅनेज झाल्यामुळे आमच्या यात्रेला तेवढी प्रसिद्धीही मिळत नाहीये. पण सोशल मीडियावर, यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोक राहुल गांधींसोबत चालत आहेत.नक्कीच भाजपालाही वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद या यात्रेला मिळेल. पण मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपा पॅनिक मोडवर गेली आहे”, असं प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

“राहुल गांधी भाजपाच्या लोकांसारखे..”

“या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अकोल्यात एका शाळेत आणि एका फार्महाऊसवर मुक्कामाला थांबणार आहेत. अगदी मूलभूत व्यवस्थेमध्ये राहुल गांधी राहणार आहेत. भाजपाच्या लोकांसारखे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहणार नाहीत. शिवाय राहुल गांधी स्वत: ४०-४० किलोमीटर रोज चालत आहेत. हे सगळं बघून भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे”, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली.