नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यावरुन अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिल्यानंतरही सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आणि त्यांनी विजय देखील मिळवला. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसने सत्यजीत तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आणि काँग्रेसमधील दुफळी उफाळून समोर आली. कालपासून सत्यजीत तांबे आणि नाना पटोले एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यावर आता राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे विदर्भातील नेते सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर सुनील केदार यांनी सूचक विधान केले आहे.
काय म्हणाले सुनील केदार?
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील केदार म्हणाले की, “हे जे घडले ते चांगले नाही. ही घटना दुर्दैवी आहे. या सगळ्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने सर्व काँग्रेसजनांना हेच सांगेल की सध्याची परिस्थिती एकमेकांना समजून घेण्याची आहे. पक्ष कमजोर होईल, अशी विधाने करणे किंवा कृती करणे योग्य होणार नाही. एकत्र बसून घरातला विषय घरातच सोडविण्यासंबंधी भूमिका वठवली पाहीजे. या सर्व घडामोडीमुळे पक्ष कमजोर झालाच आहे. पण अजूनही पक्ष नेतृत्व एकीकडे देशात पक्ष मजबूत करायला निघालेले असताना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घरातले प्रश्न घरात बसूनच सोडवले पाहीजेत, असे माझे स्पष्ट मत आहे.”
तांबे आणि थोरात कुटुंबाला बदनाम केले गेले
सत्यजीत तांबे यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले, “मला दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी स्क्रीप्ट तयार होती. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या माणसाला बोलवून बंद पाकिटात फॉर्म देण्यात आले. ते फॉर्म चुकीचे निघाले. नंतरही आम्हाला चुकीचा फॉर्म देण्यात आला. ते म्हणतात की मुलाने उभे राहायचे की वडिलांनी उभे राहायचे, हा निर्णय तांबे परिवाराला घ्यायचा होता.मग माझ्या वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नाही. एकाच उमेदवाराचे नाव दिल्लीतून का जाहीर झाले. हा एक कट होता. बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा कट करचण्यात आला,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.
अतुल लोंढे यांच्याकडून सत्यजीत तांबे यांना प्रत्युत्तर
सत्यजित तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आरोप म्हणण्यापेक्षा त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. स्पष्टीकरण देताना त्यांनी खोटे आरोप केले आहेत. हे अतिशय क्लेशदायक आहे. ते जिंकले सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्या काही गोष्टी घडल्या त्या कशामुळे घडल्या? याचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही. त्यांनी आरोप केला की, अमरावती आणि नागपूरचे एबी फॉर्म दिले होते. पण त्यांना जे फॉर्म पाठवले होते, ते फॉर्म बाळासाहेब थोरात यांचे सहकारी सचिन गुंजाळ यांच्याद्वारे पाठवले होते. त्याचे स्क्रीनशॉटही त्यांना पाठवले होते, व्हॉट्सॲपवर त्यांचा ‘ओके’ असा रिप्लाय आला आहे, हे कोरे एबी फॉर्म आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.”