Satej Patil : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. आज (४ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक मतदारसंघात घडामोडी पाहायला मिळाल्या. मात्र, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. याची चर्चा राज्यातील राजकारणात झाली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. तसेच राजेश लाटकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या काही तासात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
यातच मधुरिमाराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. “मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना”, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडीओही व्हायरल झाला. यानंतर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सतेज पाटील कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक झाले.
सतेज पाटील काय म्हणाले?
“मला आज दोन वाजून ३६ मिनीटांनी मालोजीराजे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, उमेदवारी अर्ज माघार घेणार आहोत. मी त्यांना म्हटलं की असा निर्णय घेऊ नका. कारण एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेऊन दिली होती. मी त्यांना म्हटलं की, कितीही संकटे असू द्या. पण असा निर्णय घेऊ नका. शेवटी जेव्हा निवडणूक लागते तेव्हा आपण निवडणुकीत ताकदीने उतरतो. मी त्यांना म्हटलं की काहीही काळजी करू नका. काही झालं तर ती जबाबदारी बंटी पाटील म्हणजे माझी असेल आणि असं सांगितलं आणि फोन बंद केला. त्यानंतर मी लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. त्यानंतर काय घडलं? याच व्हिडीओ सर्वांनी पाहिला असेल. कारण ती परिस्थिती माझ्या हातात नव्हती. काय घडतंय हे मला समजलं नव्हतं. आता त्यांचा हात उमेदवारी थांबवणं मला देखील संयुक्तिक वाटतं नव्हतं. तेव्हा माझ्याकडून एखादं वाक्य जाऊ नये, त्यामुळे मला लोकांनी गाडीत बसवलं आणि जायला सांगितलं. आता सर्व हे घडल्यानंतर माझ्याकडे उत्तर नव्हतं”, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
माझ्या डोळ्यांत अश्रू असले तरी, मी कधीही झुकणार नाही… कोल्हापूर उत्तर नेहमीच काँग्रेसच्या बाजूनेच असेल!
— मी मुंबईकर सेवा सैनिक….. (@sonidharmeshj) November 4, 2024
– सतेज बंटी पाटील @satejp ??#We_Support_Satej_Patil pic.twitter.com/RqdlM3VuuR
सतेज पाटील पुढे म्हणाले, “मला महाराष्ट्रभरातून सर्वांचे फोन येत आहेत. नाना पटोले यांचाही फोन आला. उद्धव ठाकरेंचाही फोन आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचाही फोन आला, सर्वांचे फोन येत आहेत. ही उमेदवारी मागे घेण्याची घटना घडल्यानंतर माझीही थोडी नैतिक जबाबदारी दडपण आहे. नेता म्हणून हे घडायला नव्हतं पाहिजे. हे माझ्या करिअरच्या दृष्टीनेही माझ्यावर नैतिक दडपण आहे. मात्र, मला थोडा वेळ द्या, उद्या योग्य तो निर्णय घेतो. मी काही वेळापूर्वीही गाडीत पदाधिकाऱ्यांना म्हटलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि…”, असं म्हणत सतेच पाटील यांना अश्रू अनावर झाले.