गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही आमदारांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना आता काँग्रेस पक्षामधून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात असून यासंदर्भात थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आपल्याच मंत्र्यांमुळे आमदार नाराज?
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असून देखील त्यांच्याकडून कामं लवकर होत नसल्याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराज आमदारांची संख्या जवळपास २५ असल्याची देखील चर्चा सुरू आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही आमदार मंडळी दिल्लीला एका प्रशिक्षणासाठी जाणार असून तेव्हाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं सांगितलं जात आहे.
याआधी देखील काँग्रेसनं राज्यात उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, नंतर चर्चेतून नाराजी दूर झाली असून मतभेद असले तरी मनभेद नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा हे नाराजीनाट्य सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
काँग्रेसनं यााधी देखील अनेक वर्ष सत्ता पाहिली आहे. त्यामुळे सत्तेत मंत्री असताना देखील आपली कामं वेगाने होत नसल्याची तक्रार या आमदारांची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महामंडळं आणि दंडाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या, जिल्हा समित्यांची नियुक्ती या गोष्टी बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याची देखील या आमदारांची तक्रार आहे.
दरम्यान, पाच राज्यांमध्ये मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर आधीच पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षासमोर ज्या राज्यात सत्ता आहे, तिथून देखील नवनव्या अडचणी उभ्या राहात असल्यामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढत असल्याचं दिसून येत आहे.