देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. काँग्रेसचा अनेकदा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही. काँग्रेसची भूमिका आणि वक्तव्ये पाहिली तर १०० वर्षं सत्ता येऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन करोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही (काँग्रेस) लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला’’, असा आरोप मोदींनी केला होता.
दिल्लीच्या राज्य सरकारनेही झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन लोकांना गावी जाण्यासाठी बाहेर काढले. त्यांच्यासाठी दिल्लीतून बसगाडय़ांची व्यवस्था केली आणि मध्येच कुठेतरी सोडून दिले. त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांत नसलेला करोना वेगाने पसरत गेला, अशी टीकाही मोदींनी केली.
त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत स्टेशनच्या बाहेर लोकांना जेवण देणं म्हणजे लोकांना घाबरवणं हे मला माहीत नव्हतं, असं म्हटलं आहे. “सॉरी सर, आपला जीव धोक्यात घालून स्टेशनच्या बाहेर लोकांना जेवण देणं म्हणजे निरपराध लोकांना घाबरवणं हे मला माहीत नव्हतं!”; असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने अचानक लागू केलेल्या टाळेबंदीमुळे लाखो मजूर व गोरगरिबांचे हाल झाले. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकारने केली होती. अडकून पडलेल्या ५० हजार मजुरांना काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने आपापल्या गावी परत पाठविले होते. केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यानेच आम्ही मदत केली व त्याचा आम्हाला अभिमान, असे प्रत्युत्तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर दिले.