विधान परिषदेमध्ये भाजपानंतर शिवसेना (ठाकरे गट) हा सर्वांत मोठा पक्ष होता. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे आहे. परंतु, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी गेल्या महिन्यात शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी होऊन राष्ट्रवादीच्या संख्येप्रमाणे झाली होती. परिणामी ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले होतं. हे पद आता राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले दोन आमदार अजित पवारांच्या गटात सामील झाले. त्यामुळे शरद पवार गटाची सदस्य संख्या कमी झाल्याने अंबादास दानवे यांचं पद कायम राहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाची विधान परिषदेतली सदस्यसंख्या पुन्हा एकदा कमी झाली. सध्या ठाकरे गटाकडे विधान परिषदेत एकूण आठ सदस्य आहेत. तर काँग्रेसकडे नऊ सदस्य आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेदेपदासाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे या पदासाठी इच्छुक आहेत. वंजारी यांनी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना पत्र लिहून काँग्रेस हायकमांडकडे विनंती केली आहे की, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं.

अभिजीत वंजारी यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी वंजारी म्हणाले, सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बरी नाही. त्यातच विधान परिषदेतले राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेत आता काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसने या पदावर दावा केला आहे आणि तो करायलाच हवा होता.

हे ही वाचा >> खातेवाटपासंदर्भात अजित पवार-अमित शाह भेटीत काय चर्चा झाली? प्रफुल्ल पटेल म्हणाले…

अभिजीत वंजारी म्हणाले, आम्ही एकूण नऊ आमदार आहोत. यापैकी मला हे पद मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर आमचे आमदार राजेश राठोड यांनीही तशी इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही पक्षश्रेष्ठींकडे ही इच्छा व्यक्त केली आहे. विदर्भात काँग्रेसला बळ द्यायचं असेल तर माझा उपयोग काँग्रेस करू शकते, म्हणून मी या पदावर दावा केला आहे.