काँग्रेसच्या विधान परिषदेच्या सदस्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर बुधवारी रात्री साडे आठ वाजता कसबे धावंडा गावात एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. नशेत तुल्ल असलेल्या या व्यक्तीने गावात मार्गदर्शन करत असताना आमदार सातव यांना मागे ओढून चापट मारली. तर डॉ. प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुकवर व ट्विटरवर या हल्ल्याची माहिती दिली आहे. आपल्या जिवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करीत राहणार असल्याचे त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात स्पष्ट केले आहे.
आमदार डॉ. प्रज्ञा सातव या जनतेची प्रश्न जाणून घेण्यासाठी दररोज किमान तीन ते चार गावाना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधतात. यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्तेही असतात शिवाय एक महिला पोलिस कर्मचारीही त्यांच्या सोबत असते. आमदार डॉ. सातव या दिनक्रमानुसार कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. रात्री त्या गावात पोहोचल्या तेव्हा कारमधून उतरत असतांना एक व्यक्ती त्यांच्या वाहनाच्या दरवाजा जवळच येऊन उभा राहिला. त्यामुळेे आमदार डॉ. सातव वाहनाच्या खाली आल्याच नाही. त्यानंतर गावकरी आल्यानंतर त्या वाहनाच्या खाली उतरल्या अन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतांना तो व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आला अन अचानक त्यांना बाजूला ओढून चापट मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आमदार डॉ. सातव तसेच इतर गावकरीही गोंधळून गेले. डॉ. सातव यांनी तातडीने वाहनात बसून थेट कळमनुरीत दाखल झाल्या. त्यानंतर रात्री उशीरा या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
कळमनुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने गावात जाऊन महेंद्र डोंगरदिवे यास ताब्यात घेतले आहे. त्याचे विरुद्ध आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र डोंगरदिवे हा नशेत होता, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.