काँग्रेसचे दिवंगत खासदार राजू सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला आहे. हिंगोलीतील कसबे धावंडा या ठिकाणी ही घटना घडली. नशेत असलेल्या एका व्यक्तीने आमदार सातव गावात मार्गदर्शन करत अचानक मागून येऊन ओढलं आणि चापट मारली. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या हल्ल्यावर प्रज्ञा सातव यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच मला भीती दाखवून घरी बसवण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केला. त्या गुरुवारी (९ फेब्रुवारी) एबीपी माझाशी बोलत होत्या.
प्रज्ञा सातव म्हणाल्या, “मी कळंबनेरी तालुक्याच्या काही गावांमध्ये भेटीगाठी घेत चालले होते. मी आठ-साडेआठच्या सुमारास कसबे धावंडा येथे गेले. त्यावेळी मी गाडीतून उतरत असताना माझ्या गाडीजवळ आला. तसेच गाडीत घुसू लागला. मी सतर्क होऊन गाडीचा दरवाजा बंद केला. सुरक्षारक्षकांनी त्याला बाजूला केलं आणि तिथं सुरक्षित नसल्याने आम्ही पुढे जाऊन गाडीतून उतरलो.”
“हा व्यक्ती मागून आला आणि माझ्यावर हल्ला केला”
“पुढे १५०-२०० महिला पुरुष उभे होते. त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. मी तिथे उतरले आणि संवाद साधू लागले. हा व्यक्ती मागून आला आणि माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे,” अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी दिली.
“या हल्ल्यामागे मला घरी बसवण्याचा कट”
“या हल्ल्यामागे मला घरी बसवण्याचा कट असू शकतो. महिला प्रतिनिधी आहे आणि त्यांना भीती दाखवली, घाबरवलं तर घरी बसतील असं त्यांना वाटलं असावं. मात्र, आम्ही घाबरून घरी बसणाऱ्यांपैकी नाही. आम्ही चांगलं काम करत पुढे चाललो आहे,” असंही सातव यांनी नमूद केलं.
प्रज्ञा सातव यांची फेसबूक पोस्ट काय?
“आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर अस्ताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला, तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई , इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.”
हेही वाचा : “दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती
दरम्यान, कळमनुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने गावात जाऊन महेंद्र डोंगरदिवे यास ताब्यात घेतले आहे. त्याचे विरुद्ध आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र डोंगरदिवे हा नशेत होता, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.