मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय झाला असतानाही ती जागा  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याची मनसेने केलेली मागणी खोडसाळपणाची आहे, त्यामागे ‘महायुती’त भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे, ही मागणी करून मनसेने मोठी चूक केली आहे, आपण त्याचा धिक्कार करतो, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रश्नावर मनसे व काँग्रेस हे दोघेही राजकारण खेळत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आठवले आज येथे आले होते. त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईतील इंदू मिलच्या जागेसाठी २९ नोव्हेंबरला संसदेवर आरपीआयचा मोर्चा नेला जाणार आहे, त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत जागेचा ताबा न मिळाल्यास ६ डिसेंबरला आरपीआयचे कार्यकर्ते जागेचा ताबा घेतील व काही घडले तर त्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.
ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. इंदू मिलची जागा ठाकरे यांच्या स्मारकासाठी मागणारे मनसेचे नगरसेवक संदिप देशपांडे व काँग्रेसचे सुनील मोरे या दोघांची वेडय़ाच्या रुग्णालयात रवानगी करुन त्यांना दोन्ही पक्षांनी काढून टाकावे, असेही आठवले म्हणाले. भांडणे लावणे हे राज व मनसे यांची सवयच आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
मराठा आरक्षणास आपला केवळ पाठिंबाच नाहीतर यापुढे या चळवळीत आरपीआय सक्रिय सहभागी होणार आहे. मराठा व ब्राम्हण समाजातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळाले पाहिजे, आरपीआय हे केवळ दलितांचा पक्ष आहे, ही प्रतिमा बदलण्यासाठी आपले प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत भालेराव, काका खांबाळकर, राजा कापसे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.       

Story img Loader