अकोला : ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची चौकशी केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
‘ईडी’ने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. दोन दिवस चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. याविरोधात अकोल्यातील काँग्रेस कायकर्ते रस्त्यावर उतरले. केंद्रातील मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती मदनलाल धिंग्रा चौकात उड्डाणपुलाखाली रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाददेखील झाला. यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातही आंदोलन
बुलढाणा जिल्ह्यातदेखील काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शेगाव येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्का रोको व जेल भरो आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करून घोषणाबाजी केली.