MP Kalyan Kale On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. एवढंच नाही तर निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने आश्वासन दिलं होतं की जर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येतील. आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येऊन काही महिने झाले आहेत. मात्र, अद्याप लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याच्या आश्वासनावर कोणताही निर्णय झालेला नाही. यातच आता लाडकी बहीण योजनेबाबत काही निकष लावल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात येत असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी एक मोठा दावा केला आहे. ५० लाख लाडक्या बहि‍णींची चौकशी सुरु असल्याचं कल्याण काळे यांनी म्हटलं आहे. तसेच हळूहळू ही लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचंही विधान खासदार कल्याण काळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

खासदार कल्याण काळे काय म्हणाले?

“लाडक्या बहि‍णींच्या चौकशीबाबत तुमच्यापर्यंत ९ लाखांचा आकडा आला, माझ्यापर्यंत १८ लाखांचा आकडा आला आहे. मात्र, आता हा आकडा ५० लाखांपर्यंत जाणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत एकच सांगतो की हळूहळू ही योजना बंद होणार आहे. ही लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी करण्याचा कार्यक्रम होता”, असा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केला आहे.

“आमच्या लाडक्या बहि‍णींना वाटलं की लाडकी बहीण योजना आहे म्हणून पैसे दिले. पण ते मतांसाठी पैसे दिले होते. आता कळायला लागलं की महायुतीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. सरकारने आता जवळजवळ ५० लाख महिलांची चौकशी सुरू केली आहे आता त्या महिलांचे नावं या योजनेतून कसे कमी होतील यासाठी हे सर्व सुरु आहे. पण ही लाखो बहिणींची फसवणूक केली जात आहे. अशा पद्धतीने जर कोणी आमच्या बहि‍णींचा निवडणुकीसाठी उपयोग करणार असेल तर आम्ही याचा जाब अधिवेशनात सरकारला विचारणार आहोत”, असं खासदार कल्याण काळे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader